नवापूर । शहरातील वेडूभाई गोविंदभाई राजपूत नगरात रात्रीच्या वेळी दोन घरफोड्या करून हजारोंचा मुद्देमाल आणि दागिणे लंपास करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे रविवारीच नवनियुक्त पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. नवी अधिकार्यांचे चोरट्यांनी पहिल्याच दिवशी चोरी करून स्वागतच केले असल्याची चर्चा आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास वेडूभाई गोविंदभाई राजपूत नगरात दोन शिक्षकांच्या घरात चोरीची घटना घडली. यात शिक्षक राजेंद्र मोरे हे कामानिमित्त पुण्याला गेले होते. शिक्षक दाम्पत्य नितिन वसावे व त्यांच्या पत्नी उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी गावी गेले होते. चोरट्यांनी घरावर डल्ला मारत राजेंद्र यांच्या घरातून 13 हजार 500 रुपये व 8 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिणे असा एकूण 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. तर नितिन वसावे यांच्या घरातील सामान आस्तवस्त करून किरकोळ चोरी झाल्याची तक्रार नवापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.