जळगाव ।शहरात होणार्या चोर्यांमुळे नागरिकांत भीती व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यात तर हे प्रमाण वाढले आहे. मोबाईल चोरी, पाकिटमारी तसेच मंगळसूत्र लांबवण्याचे प्रकार भरदिवसा व गर्दीच्या ठिकाणी घडत आहेत. याचा विचार करून पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. यातच रविवारी सकाळी 10 ते 10.30 वाजेच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत प्रवाश्याच्या खिशातून पाकिट चोरण्याच्या प्रयत्नात असणार्या दोघांना जिल्हा पेठ पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांची विचारपूस केली असता दोघांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात त्यांच्यावर 151 प्रमाणे कारवाई करण्यात आली.
पाकिट चोरीच्या प्रयत्नात असतांना पकडले
शहरातील नविन बसस्थानकावर बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाश्यांची चांगलीच गर्दी असते. यातच रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास नविन बसस्थानकावर महामंडळाची बस उभी असल्याने प्रवाश्यांनी बसमध्ये चढण्यासाठी गर्दी केली. यात दोन जण एका प्रवाश्याच्या खिशातील पाकिट चोरट्याचा प्रयत्न करीत असतांनाच जिल्हा पेठ पोलिस ठाण्यातील डिबी कर्मचारी राजेश मेढे, अल्ताफ पठाण, नाना तायडे, अजित पाटील, शेखर पाटील हे बसस्थानकावर गस्त घालत असतांना त्यांना दोघे पाकिट चोरीच्या प्रयत्नात असतांना दिसले. त्यांनी लागलीच त्या ठिकाणी जावून दोघांना पकडले. त्यांची विचारपूस केली असता एकाने मोहन प्रकाश भारूडे (वय-18 रा. रथचौक) तर दुसर्याने देवेंद्र प्रकाश भावसार (वय-22) असे नाव सांगितले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून मात्र पोलिसांना काहीही मिळून आले नाही. यानंतर दोघांना पोलिस ठाण्यात नेवून 151 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, पाकीट चोरी करणार असल्याचीही कबूली त्यांनी पोलिसांना दिली. दरम्यान, वर्दळीच्या ठिकाणी मोबाईल, सोने, पाकीट चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. तर बस स्थानकावर आता पाकिटमारंनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. यातच चोरीचे प्रकार घडताना दिसत आहेत.