नविन शॉपिंग सेंटरला डॉ. आंबेडकर यांच्या नावाची मागणी

0

अमळनेर । अमळनेर येथील नगरपरिषदेच्या नवीन इमारती लगत असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर हे अतिक्रमित होते ते काढण्यात आले. त्याठिकाणी नवीन प्रशासकीय इमारती लगत नवीन शॉपिंग बांधण्यात आले. त्या शॉपिंगला पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष साहेबराव शेजवळ व तालुकाध्यक्ष श्याम संदानशिव यांनी निवेदनात केली आहे. न.पा.ने देखील इमारत बांधण्यासाठी नगरविकास खात्याला चुकीचा व दिशाभूल करणारा पत्र व्यवहार केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शहरातील आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत व भविष्यात अशांती निर्माण होण्याची व जनता रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे. म्हणून याची दखल घेऊन चौकशी व्हावी व संबंधित तोडफोड करणार्‍या विरुद्ध कारवाईचे आदेश होऊन पूर्वीचा ठराव रद्द करून नवीन शॉपिंग सेंटरला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

कारवाई न झाल्यास आंदोलन
डॉ.बाबासाहेब यांच्या 125वी जयंती निमित्त इंदू मिलचा व भव्य स्मारकाचा प्रश्न सोडविला. इंग्लडमध्ये राहत असलेले निवासस्थान विकत घेऊन आंबेडकरी जनतेचा मान राखला. परंतु अमळनेर नगरपरिषदेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेले शॉपिंग अतिक्रमित म्हणून पाडले. पण त्याजागी नवीन नगरपरिषद प्रशासकीय इमारती लगत नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले पण तत्कालीन नगराध्यक्षा व नगरसेवक यांनी त्या शॉपिंग बाबत नगरपरिषदेत ठराव करताना ठरावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विसर पडला व ठरावात सुद्धा डॉ.बाबासाहेब यांचे नाव देण्यात येईल, असे नमूद केले नाही. सदरचा ठराव बेकायदेशीर असल्याचे व आंबेडकरी जनतेच्या भावना दुखविणार व चिड आणणारा आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब यांच्या नावाची दखल घेतली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.