जळगाव । मार्च 2017 रोजी राज्य शासनाने विद्यापीठांसाठी नवीन कायदा लागू केला.नविन विद्यापीठ कायद्याप्रमाणे विविध प्राधिकरणे मंडळांच्या निवडणुका घेण्यात येणार आहे. निवडणुका होणार असल्याने त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने निवडणुक संदर्भातील परिपत्रक जारी केले आहेत. आता आठवडाभरातच प्राधिकरणांच्या निवडणुकीचे वेळापत्रक घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 31 ऑक्टोबर 2015 पासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्व 16 प्राधिकरणांच्या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर प्राधिकरणांची निवडणूक झाली नाही .या नवीन कायद्यानुसार यापुढे विद्यापीठांचे कामकाज चालणार असून, प्राधिकरणांची निवडणुक हा त्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. 17 मे 2017 रोजी शासनाने परिपत्रक जारी करून विद्यापीठांना पाठवले आहेत. त्यात निवडणुकांच्या संदर्भात सर्व माहिती, मार्गदर्शन करण्यात आले आहे. परिनियमांत दिलेल्या पद्धतीनुसार निवडणूक घेता येणार आहे. विद्यापीठात साडेसहा वर्षांनंतर प्राधिकरणे मंडळांची निवडणूक होणार आहे.
विद्यापीठाचा बिनविरोधसाठी प्रयत्न
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्राधिकरणांच्या निवडणुकांसाठीची पूर्वतयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शासनाकडून मार्गदर्शक तत्त्वे आल्यामुळे आता आवश्यक ते बदल करून वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुका बिनविरोध व्हाव्यात या अनुषंगाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासन प्रयत्न करत आहे. कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी.पाटील यांनी यापूर्वी देखील विविध कार्यक्रमात बोलतांना निवडणूक बिनविरोध व्हावे यासाठी आवाहन करतांना दिसून आले आहे.
पीएच.डी.मुळे प्राध्यापकांना ’ब्रेक’
प्राधिकरणे, मंडळांवर जाण्यासाठी प्राध्यापकांना पीएच.डी.ची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्राधिकरणांमध्ये असलेल्या; परंतु पीएच.डी. नसलेल्या प्राध्यापकांना आता ’ब्रेक’ लागणार आहे. पीएच.डी. पूर्ण केलेले प्राध्यापकच प्राधिकरणाची निवडणूक लढवू शकणार आहेत. शिवाय शासनाने प्राध्यापकांच्या कोट्यातही घट केली आहे. त्यामुळेदेखील प्राध्यापक संघटना नाराज आहेत.
पदवीधर नोंदणी
विद्यापीठातुन दरवर्षी हजारोच्या संख्येने विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. पदवीधर हा स्वतंत्र मतदारसंघ असून त्यासाठी पदवीधर नोंदणी करण्यात येत असते. पदवीधर नोंदणी करण्याची फी यंदा कमी करण्यात आली आहे. मागील निवडणुकीच्या वेळी 50 रुपये प्रति अर्जाप्रमाणे फी आकारण्यात आली होती. आता ती जास्तीत जास्त 20 रुपयेच घेता येणार आहे. नोंदणी अर्ज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. पदवी प्रमाणपत्र निवासाचा कोणताही एक पुरावा सादर करून पदवीधर नोंदणी करता येणार आहे. दोन दिवसात पदवीधर नोंदणीला सुुरुवात करण्यात येणार आहे.