नवीन खेळाडूंना आणखी एक संधी

0

कोलंबो । तिसर्‍या सामन्यातच पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा फैसला लावणार्‍या भारतीय संघाने चौथ्या सामन्यातही यजमान श्रीलंकेला दयामाया दाखवली नाही.श्रीलंकेवर 168 धावांनी विजय मिळवल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, सामन्यादरम्यान आम्हाला आत्मकेंद्रित व्हायचे नव्हते. या सामन्यात खेळलेल्या नवीन चेहर्‍यांना आणखी एक संधी मिळू शकते. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली (131) आणि रोहित शर्माने (104) दुसर्‍या विकेटसाठी 219 धावांची भागीदारी केल्यामुळे 5 बाद 375 धावा केल्या. त्याला उत्तर देताना श्रीलंकेला 42.4 षटकात केवळ 207 धावा करता आल्या. सामना संपल्यावर कोहली म्हणाला की, मागील तीन सामन्यांमध्ये आम्ही दुसर्‍या डावात फलंदाजी केली होती. या समन्यात नाणेफेक जिंकल्यामुळे प्रथम फलंदाजी केली. खेळपट्टी चांगली होती.

आम्हाला स्वत:च्याच आत्मप्रौढीत अडकून राहायचे नव्हते. पाचव्या आणि शेवटच्या सामन्यातील प्रयोगाबाबत बोलताना कोहली म्हणाला की, चौथ्या सामन्यात तिघा नवीन खेळाडूंना संधी दिली. या खेळाडूंना आणखी एक संधी देण्यात येईल. आगामी आयसीसी विश्‍वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी युवा खेळाडूंना संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे.

लसिथ मलिंगाच्या 300 विकेट्स
भारताविरुद्धच्या चौथ्या सामन्यात श्रीलंकेचे नेतृत्व करणार्‍या लसिथ मलिंगाने एकदिवसीय सामन्यातील 300 विकेट्सचा टप्पा गाठला. या यशाबद्दल मलिंगा म्हणाला की, 300 विकेट्स ही फक्त एक संख्या आहे, मी खूश आहे. पण हरलो त्याचे दु:ख आहे. भारताने दिलेले आव्हान सोपे नव्हते. मागील पाच सामन्यांमध्ये आम्हाला 250 धावा करता आलेल्या नाहीत. संघातील युवा खेळाडूंना चांगली कामगिरी करायची आहे. पण अजूनही सर्वोत्तम कामगिरी करता आलेली नाही. त्यांना आणखी अनुभवाची आवश्यकता आहे. पुढच्या सामन्यांमध्ये ते चांगली कामगिरी करतील, अशी आशा आहे.