नवीन गावांसाठी 11 कर्मचार्‍यांची नियुक्ती करा

0

पुणे । महापालिकेत समाविष्ट 11 गावांमधील कामकाज तसेच या गावांमधील मिळकती आणि कर संकलन नियोजनासाठी 11 विभागांमधील 11 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. तसेच या गावांमधील नागरिकांशी संबधित कामकाज 30 विभागांच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ही गावे महापालिका हद्दीत आल्यानंतर तब्बल एका महिन्यानंतर प्रशासनाने कर्मचारी नियुक्तीचा निर्णय घेतल्याने या गावांमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. राज्यशासनाने 5 ऑक्टोबर रोजी महापालिकेत हद्दीजवळील नवीन 11 गावांचा समावेश केला आहे. या गावांचे दप्तरही पालिका प्रशासनाकडून तातडीने ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्यानंतर या गावांमध्ये अद्याप पालिकेच्या सुविधा तसेच नागरिकांना आरोग्य, कचरा आणि पाणी पुरवठा या सुविधा वगळता इतर कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या गावांमधील नागरिकांची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती. त्यानंतर या गावांच्या नियोजनासाठी प्रशासनाने महिन्याभराचा कालावधी घेत अखेर या गावांमध्ये पालिकेच्या 11 विभागांच्या माध्यमातून जबादार अधिकार्‍यांची नेमणूक करून ग्रामपंचायतीच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाद्वारे कामकाज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचे आदेश शुक्रवारी (दि.10) महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी काढलेले असून त्यानुसार, तातडीने संबधित विभागांनी कर्मचार्‍यांची नेमणूक करून ही कामे सुरू करावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.