जगताप-कलाटे वादात बांधकाम व्यावसायिक भरडणार
पाऊस नसल्याने पाणीटंचाई टाळण्यासाठी स्थायी सिमितीत निर्णय
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागामार्फत दर वर्षी सुमारे एक हजार गृहप्रकल्पांना परवाणग्या दिल्या जातात. मात्र वाढत जाणारे गृहप्रकल्प आणि लोकसंख्या यामुळे पाणी, स्वच्छता, वीज या समस्या येत असल्यामुळे शहरातील काही परिसरातील नव्याने होणार्या गृहप्रकल्पांना मान्यता देऊ नये असा विषय स्थायी समितीमध्ये ऐनवेळी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांचे कामकाज रखडणार आहे.
मनाईचा भाग चिंचवड परिसरातील
शहरातील पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी किवळे आदी भागांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे परिसरामध्ये बांधकामचे मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. या गृहप्रकल्पांना पाणी, वीज, तसेच स्वच्छता देणे आवश्यक आहे. तसेच सद्या सगळीकडे पाण्याचा प्रश्न गंभीरआहे. त्याचबरोबर पावसाचे प्रमाण अजून वाढलेले नाही. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन मगच नवीन गृहप्रकल्पांना परवाणगी दिली जाणार आहे.
राजकारण्यांच्या वादामुळे निर्णय?
चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांच्या वादामुळेच हा निर्णय स्थायी समितीमध्ये घेण्यात आला असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. कलाटे यांचा बांधकाम व्यवसाय असल्याने त्यांच्या प्रकल्पांना अडथळे येण्यासाठीच हा विषय केल्याची चर्चा आहे. मात्र या दोघांच्या वादामध्ये चिंचवड मतदार संघातील बांधकाम व्यावसायिकांना भरडले जात आहे. या दोघांच्या वादाचा फटका या परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे.
चिंचवड परिसरातीलच गृहप्रकल्प का?
शहरामध्ये सगळीकडेच पाण्याची ओरड आहे. मग शहरातील सर्वच परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना काही दिवसांसाठी नवीन परवाणगे देण्यास स्थगिती दिली पाहिजे होती. मात्र तसे न करता फक्त चिंचवड विधानसभा परिसरातीलच गृहप्रकल्पांना काही दिवस स्थगिती का? असा सवाल करत या विषयावर चांगलीच चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे
नवीन गृहप्रकल्पांना काही दिवसांसाठी परवाना न देण्याचा स्थायी समितीचा बुधवारच्या बैठकीतील तत्काळचा विषय आहे. हा विषय सदस्यपारित ठराव असल्याने, या विषयाचा अभ्यास करून मगच निर्णय घेतला जाणार आहे.
– आयुक्त श्रावण हर्डीकर
शहरामध्ये सगळीकडे पाण्याची ओरड असल्यामुळे चिंचवड मतदार संघात पहिल्यांदा तात्पुरत्या स्वरूपात नवीन बांधकाम प्रकल्पांना परवाणा देण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. जुन्या लोकांनाच पुरेसे पाणी मिळावे या उद्देशाने हा विषय घेण्यात आला आहे.
-विलास मडिगेरी, स्थायी सदस्य