नवीन जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू करा

0

धुळे । शहरातील मुस्लिमबहुल जामचा मळा परिसरातील प्रभाग क्र.35 मधील नागरीकांसह नगसेवक फिरोज लाला, नगरसेविका सौ.जुलाह रश्मी अकील अहमद यांनी महापालिकेत येऊन आज जोरदार आंदोलन केले. जामचा मळा भागात बांधण्यात आलेला नविन जलकुंभातून येत्या 7 दिवसात पाणी पुरवठा सुरु करावा अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी महापौर कल्पना महाले आणि स्थायी समिती सभापती वालीबेन मंडोरे यांना निवेदन देऊन वस्तुस्थिती कथन करण्यात आली. जाणीवपूर्वक मुस्लिम बहुल भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे, असा आरोप नगरसेवक फिरोजलाला यांनी यावेळी
केला.

विविध प्रभागात रात्री-बेरात्री पाण्याची वेळ
शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन पुर्णपणे कोलमडले असून नागरीकांना कृत्रीम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरीकांचे हाल होत आहे. स्थायी समिती सभापती श्रीमती वालिबेन मंडोरे यांनी देखील मनपा प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळेच पाणीपुरवठा योग्यप्रकारे होत नसल्याकडे लक्ष वेधले होते. त्यातच प्रभागातील 35 मधील पुर्व हुडको, गजानन कॉलनी, जामचा मळा, गरीब नवाज नगर, ग्रीन कॉलनी, शब्बीर नगर, बहारे मदिना मशिद परिसर, बोरसे कॉलनी या भागात 8 ते 10 दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने तसेच पाणी सोडण्याची कोणतीही वेळ निश्‍चीत नसून रात्री 2 ते 3 वाजता सुध्दा पाणी सोडले जाते, प्रत्यक्षात पाणी सोडण्याचे कोणतेही नियोजन नाही. तसेच जो पाणी पुरवठा केला जातो तो पाणी सुध्दा जास्त घाण,दुषीत, गढूळ असे पाणी पुरविले जाते. यासर्वांमुळे वैतागलेल्या नागरीकांसह प्रभागाचे नगरसेवक फिरोज लाला, नगरसेविका सौ.जुलाह रश्मी अकील अहमद यांनी मनपावर मोर्चा काढला. मोर्चा मनपा आवारात धडकल्यावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

रमजान महिन्यात पाण्याची गरज
मे महिना चालू असून दि. 17 मे पासून पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. अशा काळातही पाण्यासाठी हाल होत असल्याने त्वरीत या नविन जलकुंभातून दि. 11 मे पर्यंत पाणीपुरवठा सुरु करावा अन्यथा दि. 14 मे पासून महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यातून देण्यात आला. या मोर्चात अफजल दादा मनियार, जाफर दादा मिस्तरी, शरफुदद्ीन अहेमद शेख, मोहम्मद शेख हबीब, अजगर सय्यद अकबर, शहाबान चेचीशवाले, अरुण देशपांडे, महबुब इब्राईम शेख, अस्लम पटेल, मुन्नाभाई रेतीवाले, युनुस शेख, मुन्ना मनसुरी आदींसह अनेक नागरीक सहभागी झाले.