दीपनगरातील 660 प्रकल्पाला भेल व महानिर्मितीच्या तांत्रिक अडचणींमुळे विलंब !
भुसावळ– दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील नियोजित 660 मेगावॅट प्रकल्पाचे काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची आशा आहे. प्रत्यक्षात हे काम जानेवारीत सुरू होणार असलेतरी महानिर्मितीसह भेल कंपनीच्या तांत्रिक अडचणींमुळे आता या प्रकल्पाचे काम लांबल्याचे बोलले जात आहे. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 660 मेगावॅट प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन बोर्ड ऑफ डायरेक्टरांनी मंजुरी मिळाल्यानंतर महानिर्मितीने या प्रकल्पासाठी भेल कंपनीला एलओ अर्थात कार्यारंभ आदेशापूर्वीची परवानगी दिली मात्र संबंधीत काम घेतलेली भेल कंपनी प्रकल्पाचे संपूर्ण काम स्वत: करणार नसून टर्बाईन, जनरेटर, एएचपी, सीएचपी, कुलींग टॉवर, हॉपर आदींचे काम वेगवेगळ्या मानांकित कंपन्यांच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे भेल कंपनीने आता सबकंत्राट देण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. मार्चअखेरच्या अडचणी हा प्रकल्प पुन्हा लांबणीवर पडला आहे.
मंत्री व्यस्त, उद्घाटन लांबले
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांचा नोव्हेंबर महिन्यात दीपनगरात दौरा होणार असल्याची माहिती होती. मात्र प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी हा दौरा जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात होणार होता मात्र या दोन्हीवेळी दौरा हुकला. उर्जामंत्र्यांना वेळ नसल्यानेही विलंब होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राज्य शासनाच्या उर्जा विभागाकडून प्रत्यक्षातील काम सुरू होण्यापूर्वी किमान उर्जामंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, या प्रकल्पाच्या प्रत्यक्षातील कामाला विलंब होत असल्याने कंत्राटदार व कंत्राटी, रोजंदारी कामगार आदींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
प्रकल्प कार्यालयातून कामकाज
दीपनगर 660 मेगावॅट प्रकल्पाच्या कामासाठी भौतिक सुविधांचे काम पूर्ण करण्यात आली आहे. 660 मेगावॅट प्रकल्पाचे काम यापूर्वीच्या 500 बाय 2 केंद्राच्या उभारणीवेळी तयार करण्यात आलेल्या प्रकल्प कार्यालयातून कामे सुरू केले जाणार आहे. नवीन 660 मेगावॅट प्रकल्पाचे प्रशासकीय काम सुरू करण्यासाठी या कार्यालयाचीही डागडूजी पूर्ण करण्यात आली आहे.