नवीन बसस्थानकावर पाकिटमारास नागरिकांचा चोप!

0

जळगाव। अमळनेर बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत प्रवाश्याच्या खिशातून चोरट्याने पैसे लांबविले. मात्र, त्या चोरट्यास काही मिनिटाच नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. घटना शनिवारी दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास नविन बसस्थानकावर घडली. यानंतर नागरिकांनी चोरट्यास जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. बाळकृष्ण माधव नावारकर हे कुटूंबियांसोबत राहतात. तर एमआर म्हणून कामाला आहेत. नावारकर यांना अमळनेर येथे काही कामानिमित्त जायचे असल्याने ते दुपारी 1.45 वाजता नवीन बसस्थानकावर आले होते. यानंतर बसस्थानकावर ते अमळनेर बसची वाट पाहत उभे होते. दुपारी 2 वाजेच्या सुमारास अमळनेर बस फलाटावर आल्यावर ते बसमध्ये चढण्यासाठी रांगेत उभे राहिले.

गर्दीचा फायदा घेत खिशातून काढले पैसे
यावेळी प्रवाश्यांची गर्दी जमली आणि त्यांच्या पँन्टच्या मागच्या खिशातून अज्ञात चोरट्याने नऊशे रूपये चोरले. मागच्या खिशातून काहीतरी काढल्याचा संशय नावारकर यांना येताच त्यांनी खिसा तपासला असता त्यांना पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच त्यांच्या मागे उभा असलेला तरूण सागर महारू सपकाळे याला पकडून त्याला पैसे काढल्याचे विचारले मात्र, त्याने नकार देत उडवा-उडवीची उत्तर दिले. तेथे उभा असलेल्या एका तरूणाने नावारकर यांना सागर याची तपासणी करण्याचे सांगितले. त्याची तपासणी केली असता त्याच्या पँन्टमध्ये पैसे खोसलेले आढळले. या दरम्यान, त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. त्या तरूणानेच पैसे चोरल्याचे लक्षात येताच नागरिकांनी चोरट्यास चांगलाच चोप दिला. नागरिकांनी त्याला पकडून ठेवत एसटी कर्मचार्‍यांच्या ताब्यात दिले. कर्मचार्‍यांनी लागलीच जिल्हा पेठ पोलिसांना संपर्क साधून चोर पकडल्याची माहिती दिली.

चोरट्यास घेतले ताब्यात
जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचे नाना तायडे, शेखर पाटील या कर्मचार्‍यांनी बसस्थानक गाठत चोरट्यास ताब्यात घेतले. यानंतर त्याला पोलिस ठाण्यात नेवून कसून चौकशी करण्यात आली. मात्र, पैसे परत मिळाल्याने आणि चोरटाही मिळून आल्याने नावारकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही. चोरटा सागर महारू सपकाळे हा शनिपेठ परिसरातील चौघुले प्लॉट येथील राहणारा असून त्याची गांधी मार्केट येथे अंडापावची गाडी आहे. दरम्यान, सायंकाळी त्याच्या प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले.