पुणे । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी प्रतापसिंह हायस्कूल, सातारा येथे प्रवेश मिळाला. डॉ. आंबेडकरांनी शिक्षण घेतल्यामुळे शैक्षणिक क्रांती घडली. तळागाळातील दलित समाजातील लोक शिकू लागले. युगांतराची चाहूल लागली. म्हणूनच हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून मंगळवार दि. 7 नोव्हेंबर 2017 रोजी डे. ए. सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत उत्साहात साजारा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी सरस्वतीपूजन व डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. देवबाई यांनी रचलेले डॉ. आंबेडकरांच्या जीवनपटावर आधारित ईशस्तवन त्यांनी विद्यार्थ्यांकडून गाऊन घेतले.त्यानंतर मुख्याध्यापिका वाघबाई यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांच्या विविध गुणांची आठवण विद्यार्थ्यांना करून देताना ‘खेळणी नको परंतु पुस्तके हवीच’ अशी मागणी पालकांना करा. डॉ. आंबेडकरांप्रमाणेच भरपूर वाचन करून उत्कृष्ट विद्यार्थी व्हा असे मार्गदर्शन करून विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मल्हार चक्के हा विद्यार्थी डॉ. आंबेडकरांच्या वेशभूषेत आला होता. त्यावेळी त्याने मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. उत्कृष्ट वक्तृत्व करणार्या विद्यार्थ्यांना त्वरित बक्षीस वितरण करण्यात आले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘चवदार तळ्याचे पाणी’ ही कविता उत्स्फूर्तपणे सादर केले.ज्येष्ठ शिक्षिका तिकोने यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पाखरे यांनी केले. आजीवन विद्यार्थी असणार्या डॉ. आंबेडकरांविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक तिकोने, खाडे व तळपे सर उपस्थित होते. अशाप्रकारे विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात व वैविध्यपूर्ण कार्यक्रमांतून साजरा झाला.