देहूरोड : जुने लाईट मीटरचे कनेक्शन कट करून नवीन लाईट मीटर लावून देण्यासाठी एमएसईबी देहूरोड येथे काम करणार्या एका कामगाराने तब्बल 25 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रेक्स युहॉनन देहूरोड येथील थॉमस कोलनी मध्ये राहतात. त्यांना नोव्हेंबर, 2017 या महिन्याचे लाईट बिल जास्त आल्याबद्दल त्यांनी 4 डिसेंबर2017 रोजी लाईट मीटर तपासून मिळण्यासाठी एमएसईडीसीएल प्राधिकरण कार्यालयात नियमाप्रमाणे 177 रुपये भरले. 09 फेब्रुवारी, 2018 रोजी रेक्स यांना वैभव राऊत यांचा फोन आला. मी देहूरोड एमएसईबी देहूरोड मधून बोलत आहे. तुमचे लाईट मीटर कनेक्शन कट करण्यासाठी आम्ही येत आहोत. यावर रेक्स यांनी घरी नसल्याचे कारण सांगितले.
एमएसईबीत नोकरीस नसल्याचे निष्पन्न
दोन ते चार दिवसानंतर रेक्स व वैभव राऊत देहूरोड परिसरात भेटले. यावेळी वैभव राऊत याने रेक्स यांच्याकडे जुना मीटर काढून नवीन मीटर बसविण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी केली. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते रमेशन यांनी देहूरोड भागात चौकशी केली असता, वैभव राऊत एमएसईबी मध्ये नोकरीला नसल्याचे निष्पन्न झाले. तरीदेखील वैभव राऊत याने 20 फेब्रुवारी रोजी रेक्स यांच्या घरचे जुने कनेक्शन बंद करून रेक्स यांच्या बंगल्याला दुसरीकडून लाईट जोडून दिली. यावेळी गणपत पारधे हे विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी रेक्स यांच्या घरी हजर होते.
राऊत खाजगी एजंट
रामेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव राऊत हा एक खाजगी एजंट असून तो अशा प्रकारे थकीत वीजबिल असणार्या नागरिकांकडून पैसे उकळून जुने कनेक्शन बंद करून नवीन कनेक्शन जोडून देतो. वैभव राऊत यांच्याकडे पेंडिंग बिल असणार्या सर्व थकबाकीदारांच्या नावाची यादी आहे. अशा प्रकारचा अपारदर्शक कारभार संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असून ही वीज वितरण कंपनीला लागलेली एक कीड आहे. असेही रमेशन यांनी सांगितले. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात वैभव राऊत विरोधात फिर्याद दिली आहे.