नवीन योजनांचा लाभ घ्या

0

खेडशिवापूर । पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीने गावांमधील विकासकामांचा आढावा घेतला. भेटी दरम्यान समितीने कोंढणपूर येथील सभेत गावातील गटबाजी दूर ठेवून नवीन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभापती सुरेखा चौरे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या सामजकल्याण विभागाच्या सभापती सुरेखा चौरे, जि.प. सदस्या पूजा पारगे, माजी जि. प. सदस्य नवनाथ पारगे, कोंढणपूरचे सरपंच संदीप मुजुमले, सरपंच विश्‍वनाथ मुजुमले, उपसरपंच मधुकर शिरोळे, डोणजे गावाच्या सरपंच कांबळे, मुकुंद मुजुमले, ग्रामसेवक शहाजहान बाणदार उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांसोबत या समितीने गावातील विकासकामांची पाहणी केली. ग्रामसेवक बाणदार यांनी आलेल्या निधीचा विकास कोणत्या ठिकाणी केला आहे, याची माहिती दिली. गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषदेच्या निधीमुळे गावाचा कायापालट झाल्याचे सरपंच संदीप मुजुमले यांनी सांगितले. गावाचा विकास व्हायचा असेल तर अंतर्गत वाद बाजूला ठेवून एकजुटीने विकासकामात सहभागी झाले पाहिजे. कामाबद्दल कोणाची तक्रार असल्यास ती माझ्या निदर्शनास आणून द्या, असे आवाहन जि. प. सदस्या पूजा पारगे यांनी यावेळी ग्रामस्थांना केले. सभापती चौरे यांनी नव्याने आलेल्या महिला बचत गट योजना, शेळीपालन, पापड गृहउद्योग यांची माहिती दिली. नवीन घरकुलचे प्रस्ताव तयार असतील तर ते पाठवून द्या, त्यावर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीत त्वरित निर्णय घेण्यात येईल, असेही सांगितले.