अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल
विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला इशारा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने भोसरी येथे नवीन रूग्णालयाची उभारणी सुरू आहे. हे सुसज्ज रुग्णालय चालविणे महापालिकेस पूर्ण क्षमतेने अशक्य असल्याने, ते खाजगी संस्थेमार्फत चालविण्यास देण्याचे प्रयोजन आहे. आरोग्य वैद्यकीय सुविधा ही मनपाची मूलभूत सुविधा असून शहरातील गोरगरीब, झोपडपट्टीतील सर्वसामान्य नागरीकांसाठी ही सुविधा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोतून अतिशय महत्वाची आहे. शहरातील जनतेच्या आरोग्य वैद्यकीय सुविधेशी खेळाचा प्रयत्न न करता भोसरी येथील रुग्णालय खाजगी तत्वावर न देता महानगरपालिकेमार्फत चालविण्यास द्यावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरातील नागरीकांसह तीव्र आंदोलन करेल, असा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन साने यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.
रुग्णालयांचे काम मनपामार्फत
हे देखील वाचा
मनपाच्या वाय.सी.एम. रुग्णालयामध्ये शहरातीलच नव्हे तर शहराबाहेरुन पुणे जिल्हातून रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी येत असतात. शहरामध्ये वाय.सी.एम.रुगणालयसह, तालेरा, जिजामाता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भोसरी, आकुर्डी, यमुनानगर, इंदिरा गांधी, खिंवसरा पाटील इत्यादी रुग्णालये सद्यःस्थितीत कार्यरत आहे. यातून शहरातील नागरीकांना समाधानकारक वैद्यकीय सुविधा पुरवित आहेत. ही सर्व रुग्णालये मनपामार्फत चालविली जात आहेत. तर दुसरीकडे वाय.सी.एम.मधील रुबी अल केअर हे मनपाचे रुग्णालय खाजगी संस्थेस चालविण्यास दिले आहे. परंतु या रुग्णालयाबाबत रुग्ण व नागरीकांशी उद्धट वर्तन, राज्य शासनाच्या वैद्यकीय योजना व्यवस्थित न राबविणे, रुग्णांकडे लक्ष न देणे, लोकप्रतिनिधींचे फोन न घेणे, त्यांच्याशी उद्धट वर्तन करणे इत्यादी स्वरुपाच्या गंभीर तक्रारी या रुग्णालयाबाबत येत आहेत.
पुर्व अनुभव क्लेशदायक
भोसरीतील रुग्णालय अपुर्या कुशल मनुष्यबळामुळे खाजगी तत्वावर देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शासनाने महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विविध संवर्गांतील पदे व त्यानुषंगिक वेतन श्रेणीस शासनाने मान्यता दिलेली आहे. या संस्थेमधून आपणांस कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. मनपास रुबी अल केअर या रुग्णालयाचा खाजगी तत्वावर देण्याचा अनुभव क्लेशदायक आहे. तरी सुध्दा भोसरीचे प्रस्तावित रुग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देण्याचा अट्टाहास केला जात आहे. उद्या अपुरे मनुष्यबळ आहे म्हणून महापालिका देखील खाजगी तत्वावर चालविण्यास देण्याचा ठराव देखील आपण आणू शकता. हा कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे, स्थानिक आमदारांना या माध्यमातून त्यांना त्यांचे नविन दुकान चालू करावयाचे आहे काय याचा सर्वांनी विचार केला पाहिजे.
नेत्यांचे समस्यांकडे दुर्लक्ष
सन 2016 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीने आणि कल्पकतेमधून या भोसरी रुग्णालयाची संकल्पना मांडण्यात आली होती. त्याचे भूमीपूजन खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झालेले आहे. गेल्या दिड-दोन वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. परंतु आतापर्यंत एकही असा प्रकल्प नाही की, त्याला फक्त भाजपने करुन दाखवले आहे. राष्ट्रवादीच्या काळातील मंजुर केलेले, भूमिपूजन केलेली कामे त्यांची नांवे बदलून त्यांची उद्घाटने करायची. हे काम आम्ही केले म्हणून टिमकी वाजवायची ही भाजपची सवय आता शहरवासियांच्या चांगली ओळखीची झाली आहे. भाजपचे पदाधिकारी त्यांच्या अंतर्गंत कुरघोड्या सुरु असून फक्त टक्केवारीच्या राजकारणात गुंतले आहे. शहरातील महत्वाच्या प्रश्नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळेच शहरात आज कचर्याची भंयकर समस्या निर्माण झाली आहे. ऐन हिवाळ्यामध्ये आताच पाण्याची बोंबाबोब सुरु झालेली आहे. शहरातील मूलभूत सुविधांचीच बोंब आहे. तर नविन विकास कामे व प्रकल्प काय करणार.