ठाणे । गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ठाणे-मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यानच्या मनोरुग्णालयाच्या जागेवरील नवीन विस्तारित रेल्वे स्थानकाला मध्य रेल्वे प्रशासनाने सशर्त मंजुरी दिल्यानंतर आता स्थानकासाठी मनोरुग्णालयाची जागा देण्यासही आरोग्य विभागाकडून तत्वता मान्यता देण्यात आली आहे. या जागेच्या बदल्यात तीन पर्याय दिले असून यापैकी एका पर्यायावर शिक्कामोर्तब करून येत्या 7 दिवसात हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. ठाणे-मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थनाकाच्या जागेसाठी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रवाशांच्या गर्दीमुळे अपूरे पडतेय रेल्वेस्थानक
ठाणे-मुलुंडदरम्यान नव्या विस्तारित रेल्वे स्थानकाची निर्मिती करून नव्याने विकसित झालेल्या शहराला वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न केले जात आहे. सध्याचे मध्य रेल्वेचे ठाणे स्थानक प्रवाशांच्या गर्दीमुळे अपुरे पडत आहे. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ठाणे स्थानकातून सुमारे साडेसहा लाखांहून अधिक प्रवासी दैनंदिन प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या स्थानकातून उपनगरीय रेल्वेच्या दिवसाला सुमारे 700 फेर्या होत असतात. तसेच ठाणे स्थानकातून 79 उपगरीय रेल्वे गाडया सुटतात. गेल्या काही वर्षांत ठाणे तसेच आसपासच्या शहरांची लोकसंख्या काही लाखांमध्ये वाढली असून त्यामुळे विस्तारित स्थानकाचा प्रस्ताव महापालिकेने रेल्वेपुढे मांडला होता.
मनोरुग्णालयाच्या जागेच्या बदल्यात 3 पर्याय
ठाणे मुलुंड दरम्यान असलेल्या मनोरुग्णालयाची 14.83 एकर अशी एकमेव जागा असल्याने या जागेवर नवीन रेल्वे स्थानक बांधण्यासाठी महापालिकेला रेल्वेने परवानगी दिली आहे. यासाठी आरोग्य खात्यासमोर महापालिकेने तीन पर्याय दिले आहेत. यामध्ये पहिला या जागेच्या बदल्यात टीडीआर देण्यात येईल, दुसरा बिल्डएबल एफएसआय मध्ये बांधून देऊ तर तिसरा या जागेच्या मोबदल्यात ग्रीन झोन मध्ये 15 एकर अशी वाढीव जागा देणार असे पर्याय ठेवण्यात आले. यापैकी एक पर्याय येत्या 7 दिवसात निवडून मंत्रिमंडळ मंजुरीसाठी पाठवून देण्याचा निर्णय या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, आरोग्य खात्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, शिवसेना उपनेते विजय नाहटा, संचालक पवार, उप संचालक तायडे, रेल्वेचे कार्यकारी अभियंता एस. एम. माहेश्वरी, महापालिकेचे कार्यकारी अभियंता पापळकर व इतर अधिकारी उपस्थित होते.