भुसावळात रेल्वे सल्लागार समितीची बैठक ः रेल्वे स्थानके टाकणार कात
भुसावळ : नवीन वर्षात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून मेमू ट्रेन धावणार असून त्या संदर्भातील परीक्षण सुरू असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत देण्यात आली तसेच विभागातील रेल्वे स्थानकांवर विविध विकासकामांसह भुसावळातील पादचारी पुलाचा प्रश्न लवकरच सोडवण्यासह रेल्वे स्टेशन केअर कमेटीची बैठकही लवकरच होणार असल्याचे प्रसंगी अधिकार्यांनी सांगितले. भुसावळ डीआरएम कार्यालयात बुधवारी रेल्वे सल्लागार समितीची 164 वी बैठक डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
नवीन वर्षात मेमू ट्रेन धावण्याची आशा
भुसावळ विभागात दोन मेमू ट्रेन दाखल झाल्या असून रेल्वे मुख्यालयाकडून त्यांचे परीक्षण सुरू आहे. नरखेड-भुसावळ तसेच भुसावळ-नागपूर रेल्वे मार्गावर नवीन वर्षात मेमू ट्रेन धावण्याची आशा आहे शिवाय लवकरच भुसावळ-मुंबई मार्गावरही मेमू ट्रेन सुरू होण्याची आशा वर्तवली जात आहे. भुसावळचे रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील यांनी मेमू ट्रेनसह भुसावळातील पादचारी पुलाबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांना नवीन वर्षात मेमू ट्रेन सुरू होण्यासह पादचारी पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी माहिती देण्यात आली.
यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीला अपर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोज सिन्हा, वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, मंडळ वाणिज्य प्रबंधक बी.अरुण कुमार, वरीष्ठ मंडळ अभियंता (समन्वय) राजेश चिखले, वरीष्ठ मंडळ परीचालन प्रबंधक डॉ.स्वप्निल नीला, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (टी.जा.) अजय कुमार, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (माल) अनिल बागले यांच्यासह रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नितीन बंग (धुळे), सुधाकर देशमुख (नाशिक), मनोज कुमार सोनी (खंडवा), राजेश झंवर (भुसावळ), महेंद्र कुमार बुरुड (मलकापूर), धर्मा पाटील (पाचोरा), वसंत कुमार बाछुका (अकोला), अनिकेत पाटील (भुसावळ), दीपक मायी (अकोला), विजय पनपलिया ( अकोला), मोहन शर्मा (मलकापूर), महेश पाटी (अमळनेर), राजनारायण मिश्रा (अकोला), दिलीप पाटील (पाचोरा), पराग बढे (चाळीसगाव), प्रवीण हरी महाजन (दोंडाईचा), सतीशचंद्र शर्मा (मुर्तिजापूर), पंढरीनाथ मदने (धुळे), जानराव कोकरे (अमरावती), नवनीत वजीरे (नाशिक) आदी 19 सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा तर आभार मंडळ वाणिज्य प्रबंधक बी.अरुण कुमार यांनी मानले.