नवीन वर्षानिमित्त जि. प. च्या विद्यार्थ्यांना वही, पेनचे वाटप

0

नारायणगाव । नवीन वर्षानिमित्त युवा शक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेतर्फे वारुळवाडी येथील ठाकरवाडी परिसरातील जि. प. च्या प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या गरजू विद्यार्थ्यांना वही, पेनचे वाटप करण्यात आले. नारायणगावचे सरपंच योगेश पाटे तसेच वारुळवाडीचे उपसरपंच जंगल कोल्हे यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले. नवनिर्वाचित सरपंच पाटे व उपसरपंच कोल्हे यांचा यावेळी फाउंडेशनकडून सत्कार करण्यात आला. प्रा. अशफाक पटेल, स्वप्निल ढवळे, अभय वारुळे, दादासाहेब कोठाळे, परशुराम वारुळे आदींसह शाळेतील शिक्षक व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

प्लॅस्टिक वापराने पर्यावरणाचे होणारे नुकसान आणि वाढणार्‍या समस्या कमी करता याव्यात, या उद्देशाने प्लॅस्टिक वापर टाळावा याबाबत जनजागृती करण्यासाठी बेल्हे गावात फाऊंडेशनतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. मनसेचे जुन्नर तालुकाध्यक्ष निवृत्ती उर्फ बडुशेठ गटकळ, शिनु गटकळ व मित्रपरिवाराच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. मान्यवरांनी युवा शक्तीच्या या कार्याचे कौतुक केले. चांगल्या कार्याला आवश्यक ती मदत करण्याचे आश्‍वासन सर्व मान्यवरांनी दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती वर्पे यांनी तर आभार प्रा. अशफाक पटेल यांनी मानले.