पुणे : शहरी भागातील ग्राहकांनी नवीन वीजजोडणीचे अर्ज केवळ ऑनलाइनद्वारेच करावेत, या महावितरणच्या आवाहनास ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन महिन्यांत सुमारे 1 लाख 7 हजार 348 ग्राहकांनी नवीन वीजजोडण्यांसाठी महावितरणकडे ऑनलाईन अर्ज केले आहेत. मोबाईल अॅप, संकेतस्थळ व हेल्पडेस्क अशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
शहरी भागात 1 नोव्हेंबरपासून नवीन वीजजोडणीचे अर्ज ऑनलाइनद्वारेच करण्याचे आवाहन केले होते. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर 93 हजार 90 ग्राहकांनी तर मोबाईल अॅपद्वारे 14 हजार 258 ग्राहकांनी ऑनलाइन अर्ज केले होते. याशिवाय ऑनलाईन संबंधित विविध स्रोतांकडून मागील दोन महिन्यांत सुमारे 2 लाख 24 हजार नवीन ग्राहकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. याठिकाणी नवीन वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे.