नवीन सीईओंनी पदभार स्विकारताच सुरू केली झाडाझडती !

0

धुळे । जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश देशमुख अकोला येथील महाराष्ट्र स्टेट सीड्स कार्पोरेशन येथे मॅनेजींग डायरेक्टर या पदावर बढती झाली असून त्यांच्या जागेवर नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कळवण येथील गंगाथरण डी. रुजू झाले आहेत. त्यांनी पदभार घेताच जिल्हा परिषदेत झाडाझडती सुरु केली. उशिरा येणार्यांवर कारवाईचा इशारा देतांनाच त्यांनी काहींचे दप्तरही ताब्यात घेतल्याने लेट लतीफ अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. दि.19 रोजी सकाळी 10 वाजता नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. यांनी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडून पदभार स्विकारला.

देशमुखांनी केला सत्कार
यावेळी देशमुख यांनी गंगाथरण डी. यांचा सत्कार करुन महत्वाची कागदपत्रे त्यांना सुपूर्द केली. यावेळी विविध विभागाचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदभार स्विकारल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना नूतन सीईओ गंगाथरण डी.म्हणाले की, धुळे जिल्हा परिषदेत या आधी असलेल्या सर्वच अधिकार्यांनी चांगल्या रितीने काम केले आहे. त्यांच्या कामाची ही पध्दत यापुढे देखील सुरु राहणार आहे. मात्र त्यात काही कठोर निर्णय आपण घेतले असून जिल्हा परिषदेचे कामकाज केवळ उत्कृष्टच नव्हे तर पारदर्शी आणि प्रभावी असले पहिजे, असे गंगाथरण डी. यांनी सांगितले.

तक्रार आल्यास गय नाही!
मुख्यालयातील सर्वच अधिकारी आणि कर्मचार्यांनी वेळेवर म्हणजे ठिक 10 वाजता जिल्हा परिषदेत हजर राहिलेच पाहिजे. ग्रामसेवकांनीही सकाळी 10 वाजता त्यांच्या त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहून समस्या व तक्रारी घेवून येणार्या नागरीकांच्या शंकांचे निरसन केले पाहिजे. विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी थेट शेवटच्या घटकापर्यंत संपर्क आणि संवाद झाला पाहिजे. यावर आता भर देणार आहोत. कार्यालयात उशिरा येणार्या कर्मचार्‍यांची हयगय केली जाणार नाही, त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे, अशी अपेक्षा व्यक्त करतांनाच कुणाबद्दल तक्रार आल्यास त्याची गय केली जाणार नाही अशी तंबी द्यायलाही गंगाथरण डी. विसरले नाहीत.