नवी दिल्ली । केंद्र सरकार नवी क्रीडासंहिता लवकरच लागू करण्यात येणार असल्याचे क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सांगितले आहे. या नव्या संहितेत क्रिकेटचा समावेश असायला हवा असेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्या क्रीडासंहिता सर्वच खेळांना लागू होते. सर्वच क्रीडा महासंघ क्रीडासंहितेचे पालन करतात. अंतिम अहवाल तयार होताच आम्ही सर्वांसमक्ष तो मांडणार आहोत.
नव्या संहितेत सहभागी होण्यास बीसीसीआयचा विरोध असल्याबाबतची माहिती माझ्याकडे नाही, असेही गोयल यांनी सांगितले. बीसीसीआय स्वत:ला क्रीडासंहितेचा भाग मानत नाही. आम्ही शासकीय अनुदान घेत नसल्यामुळे क्रीडाधोरण लागू होत नसल्याचे बीसीसीआयचे मत आहे. गोयल हे बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना यांच्या शेजारी बसले होते. खन्ना यांनी मात्र यावर मतप्रदर्शनास नकार दिला. यावर योग्य वेळी चर्चा करू, इतकेच ते म्हणाले. सध्या मी कुठल्याही बाबीवर मत मांडणार नाही, असे ते म्हणाले.