बारामती । बारामती नगरपालिकेने जुनी भाजीमंडई पाडून या ठिकाणी महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान अंतर्गत भाजीमंडई शॉपिंग सेंटर व बहुमजली वाहनतळाचे नवीन बांधकाम करण्यात आले आहे. या मंडईचे घाईघाईत उद्घाटन करण्यात आले. बारामती नगरपालिकेच्या उरफाटी कारभाराचा फटका या मंडईतील गाळेधारकांना बसत आहे. उद्घाटनानंतर तब्बल 21 दिवसांनी मूळ ओटेधारकांना त्यांचे ओटे नव्याने बांधलेल्या श्रीगणेश मंडई मार्केटमध्ये ताब्यात देण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत हे गाळे मूळ ओेटेधारकांना संमती देण्यात आली.
यानुसार फुलवाले, भाजीविक्रेते, फळविक्रेते, तसेच तेथील किराणा व इतर दुकानदार यांना 360 ओटे देण्याचा निर्णय झाला. मात्र वाहनतळ हे वरच्या मजल्यावर असल्याकारणाने खरेदीसाठी वाहन वरती लावून खाली येणे हे त्रासाचे ठरणार असले तरी त्याला दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे सांगण्यात आले. याबाबतचे अधिकार व आकारणी राखून ठेवले असून त्याबाबतची वाढ 2021 साली होणार आहे. काशी कापडी समाजातील दुकानदारांना स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर फूल व हार विक्रेत्यांसाठी बाहेरच्या बाजूला जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ग्रामीण भागातील व आसपासच्या परिसरातील लोकांना मंडईच्यासमोरील भागातील जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मंडईच्या पूर्व बाजूस पंधरा ते वीस गाड्यांचा वाहनतळ आहे. हा वाहनतळ अनधिकृत असून येथील चारचाकी वाहनांना मंडईतील वाहनतळावरच वाहने लावावी लागतील अशा सूचना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भाजीमंडईत हस्तांतरण होण्यासाठी अजून दहा दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे हा प्रश्न सुटण्यासाठी बारामतीकरांना वाटच पहावी लागणार आहे. असेही यावेळी सांगण्यात आलेे. जळोची गट नं. 162 या मंजूर रेखांकनातील 9 मी रूंद रस्त्याची रूंदी 15 मी ठेवण्यासाठी वाढीव हद्द विकास योजनेमध्ये फेरबदल करण्याकरीता उपाध्यक्ष जय पाटील व नगरसेविका अनिता माने यांनी अर्ज केला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे होत्या. जेष्ठ नगरसेवक संजय संघवी, उपनगराध्यक्ष जय पाटील, विरोधीपक्षनेते सुनिल सस्ते, नगरसेवक विष्णुपंत चौधर, सचिन सातव, जेष्ठ नगरसेवक अशोककाका देशमुख, किरण गुजर, नवनाथ बल्लाळ, मुख्याधिकारी मंगेश चितळे, व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या.