नवी मुंबई :- महापालिकेत साफ सफाईचे काम पाहणार्या कंत्राटदाराने 1 ऑगस्ट पासून काम बंद करण्याचा इशारा दिल्याने प्रशासन वर्तुळात खळबळ माजली आहे. गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटदाराला ठोस उत्तर देण्याऐवजी प्रशासनाकडून फक्त पोकळ आश्वासने मिळत असल्यामुळे त्याने येत्या 1 ऑगस्ट पासून काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याचवेळी कंत्राटदारा मार्फत काम करणार्या सफाई कर्मचार्यांनी प्रशासनासोबत काम करण्याची तयारी दर्शविल्याने कंत्राटदार अडचणीत सापडले आहेत. गत तीन वर्षापासून नवी मुंबई महापालिकेत मे.बी.व्ही.जी कंपनीमार्फत सफाई कामगारांचा कंत्राट चालवला जात आहे. 40 सफाई कामगार या कंत्राटदारामार्फत अनेक वर्षापासून काम करत आहेत.
ज्या वेळी मे.बी.व्ही.जी कंपनीला सफाई कामाचा कंत्राट मिळाले त्यावेळी तो फक्त तीन महिन्यांसाठी होता. त्यानंतर तो पुन्हा नूतनीकरण करण्यात आला. दर तीन महिन्यांनी कंत्राट नूतनीकरण करण्यात येत असल्याने या प्रक्रियेनुसार वारंवार कंत्राट नूतनीकरण होऊ लागला. जर कंत्राटाचा कालावधी वाढून नाही मिळाला तर काम बंद करण्यात येईल असा इशारा यापूर्वी ही कंत्राटदारा कडून देण्यात आला होता.तरीही प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याने शेवटी येत्या 1 ऑगस्ट पासून काम बंद करण्यात येईल असा इशारा कंत्राटदारा कडून देण्यात आला आहे.
नियमात कंत्राट मिळत नाही तोपर्यंत काम करणार नाही
दर तीन महिन्यांनी होणार्या कंत्राट पुनर्प्रक्रियामध्ये आमचे नुकसान होत असून यापुढे अश्या धोरणानुसार आम्हाला काम करणे शक्य नाही. आम्ही कामगारांना वेळेवर पगार देतो. मात्र आम्हालाच पाच ते सहा महिने पैसे प्रशासनाकडून मिळत नसल्याने अखेर किती वेळ पैश्यासाठी थांबायचे असा प्रश्न कंत्राटदाराकडून करण्यात येत आहे. आज कामगारांना वेळेवर पैसे मिळत असले तरी आम्ही पैश्यापासून वंचित आहोत. त्यामुळे जो पर्यंत आम्हाला नियमात कंत्राट मिळत नाही तोपर्यंत काम करणार नाही असा पवित्रा कंत्राटदाराने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. कंत्राटदारा कडून काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला असता तोच सफाई कर्मचार्यांनी प्रशसानाबरोबर काम करण्याची तयारी दर्शवली आहे. तश्या आशयाचे पत्र त्यांनी प्रशासन अधिकार्यांना दिले आहे.
आम्ही गेल्या तीन वर्षापासून साफसफाईचे काम नित्यनियमाने करत असून या पुढेही करत राहणार,यापूर्वीही ठेकेदाराकडून काम बंद करण्यात आले असता त्यावेळी आम्ही स्वच्छता निरीक्षकांच्या देखरेखीखाली काम सुरु ठेवले होते. या वेळही आम्ही स्वच्छता निरीक्षकांच्या देखरेखीखाली काम सुरु ठेवणार आहोत.
– रजित तांडेल, सफाई कर्मचारी
मे.बी.व्ही.जी कंपनीला मनपाचा सफाई कामाचा ठेका देण्यात आला असून त्यांचा ठेका तर तीन महिन्यांनी पुनर्प्रक्रिया नुसार नियमित करण्यात येतो,त्यांना नियमित ठेका देण्यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्याला महासभेची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी त्यांचा प्रस्ताव विखंडीत करण्यात आल्याने या प्रक्रियेला वेळ लागला.
– तुषार पवार, मनपा उपायुक्त