नवी मुंबईतील अनधिकृत पबवर कारवाईची मागणी

0

नेरुळ । नवी मुंबई मनपाच्या हद्दीतील हुक्का पार्लर व पब हे नियमबाह्य चालू आहेत. त्यामुळे भविष्यात कमला मिल कंपाऊंड सारखी आपत्ती येऊ शकते. या पब व हुक्का केंद्राची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी भाजपचे पालघर व ठाणे जिल्हा सरचिटणीस यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. नवी मुंबई मनपाच्या हद्दीत बिनधास्तपणे व राजरोसपणे हुक्का पार्लर व पब चालू आहेत. या ठिकाणी शासन व मनपाने निर्गमित केलेल्या नियमांना पायदळी तुडवून पब व हुक्का पार्लर चालू आहेत. तसेच काही व्यवसाय हे अडगळीच्या ठिकाणी सुरू आसल्यामुळे भविष्यात एखादी आपत्ती आली तर अनेक निरपराध नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो म्हणून चौकशी करणे गरजेचे असल्याचे सरचिटणीस संजय पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

आयुक्तांना पालिकेचे पत्र
पब व हुक्का केंद्रामध्ये ग्राहकांची गर्दी ही जास्तच असते. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांचा फायदा होत आहे. परंतु, त्या व्यावसायिकांची नोंद मनपा व शासनाच्या कार्यालयात नसल्यामुळे साहजिकच लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याने चौकशी होणे गरजेचे असल्याचे मनपा आयुक्त एन.रामास्वामी व पोलीस आयुक्त हेमंत नगराळे याना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. याबाबत मनपाचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांना विचारले असता, अशा प्रकारचे पत्र आम्हाला प्राप्त झाले असून योग्य ती कार्यवाही करू असे सांगितले.