नवी मुंबईतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी 28 सिग्नल्स

0

नवी मुंबई । नवी मुंबई शहरात दिवसागणिक वाढणारी वाहने, अपघात पाहता वाहतूक नियंत्रित ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना बरीच कसरत करावी लागते. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दिघा ते पनवेलदरम्यान 28 नवीन सिग्नल लावण्यात येणार आहेत. सध्या या भागात एकूण 67 सिग्नल्स आहेत. नवे 28 सिग्नल्स लावल्यानंतर आणि शहरात महत्त्वाच्या सहा ठिकाणी बंद असलेली सिग्नल यंत्रणा दुरुस्त केल्यानंतर वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि विविध ठिकाणची कोंडीची समस्या सुटेल, असा विश्‍वास वाहतूक विभागाने व्यक्त केला आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई महापालिका व पनवेल विभागात स्थानिक आस्थापनेच्या मदतीने शहराअंतर्गत रस्त्यांवर तसेच महामार्गावर विविध ठिकाणी सिग्नल बसवण्यात आले आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पनवेल-शीव महामार्गावरील वाशीपर्यंतचा महामार्ग, ठाणे-बेलापूर रस्ता, पामबीच मार्ग व नेरुळ-उरण-पनवेल महामार्गापर्यंतचे विस्तीर्ण रस्ते येतात. तेथील वाहतुकीचे नियंत्रण करण्याची जबाबदारी वाहतूक विभागावर आहे. शहरात वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार व वाहतूक विभागाच्या सूचनेनुसार काही विभागांत सम-विषम पार्किंग व्यवस्था केली जाते.

सध्या शहरात एकूण 67 ठिकाणी सिग्नल आहेत. अनेक ठिकाणची सिग्नल यंत्रणाच वारंवार बंद पडते. नवी मुंबई पालिका हद्दीत सीवुड्स, एल अँड टी उड्डाण पुलाच्या पूर्व-पश्चिम दिशेला असणारे दोन्ही सिग्नल फक्त नावापुरते आहेत. आम्रमार्गावरील नेरुळ उरण फाटा तसेच महामार्गावरील अनेक सिग्नल बंद आहेत. खारघरपासून पनवेलच्या हद्दीतही अनेक ठिकाणी सिग्नल अनेकदा बंद पडतात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. शीव-पनवेल महामार्गवरील टोलवेज प्रा. लि. कंपनी तसेच पीडब्लूडी यांच्या वादात मुख्य रस्त्यावरील सिग्नल बंद आहेत.