नवी मुंबई : येथील कल्पवृक्ष सोसायटीत राहणारे डीएनएचे पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सूर्यवंशी यांना खारघर पोलीस ठाण्याला लागूनच असलेल्या मेडीसिटी हास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सायंकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
पनवेलमधील कल्पतरू हौसिंग सोसायटीत सूर्यवंशी राहतात. या सोसायटीत दोन गट आहेत. सोसायटीच्या निवडणुकीपासून सोसायटीतील रहिवाशांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. सूर्यवंशी त्यांच्या काही कामासाठी खारघर परिसरात दुपारच्या सुमारास आले असता यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हा हल्ला कुणी केला, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र, हल्लेखोरांनी सूर्यवंशी यांना हॉकी स्टीकने मारहाण केल्यामुळे त्यांना गंभीर दुखपती झाल्या आहेत. हात आणि पायाला फ्रॅक्चर आहे. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. खारघर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.