मुंबईच्या निवासी, दळणवळण, व्यापारी, शैक्षणिक व पायाभूत सुविधांवर येणारा ताण कमी करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहर वसवण्यात आले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेगाने होणार्या जागतिकीकरणामुळे हवाई रहदारीवर जो ताण पडतो आहे. त्याला पर्यायी विमानतळाच्या जागेसाठी नवी मुंबई हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे ओळखून विमानतळ उभारण्याचा निर्णय झाला. नवी मुंबईच्या अद्वितीय विकासामागील प्रेरकाची भूमिका बजावण्याचे काम सिडकोने केले. नागरिकांच्या निवास, शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यवसायविषयक व सामाजिक-सांस्कृतिक गरजांची पूर्तता करू शकेल अशा पायाभूत भौतिक सोयी=सुविधांनी परिपूर्ण असणार्या पर्यावरणपूरक आदर्श नगराची निर्मिती केली आहे. नवी मुंबईच्या अद्वितीय विकासामागील प्रेरकाची भूमिका बजावणारी सिडको देशातील अग्रगण्य नगर विकास संस्था म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यात यशस्वी झाली आहे. सिडको केवळ नवी मुंबईच नाही तर संबंध महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामागील ऊर्जास्त्रोत आहे.
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी रु. 16,000 कोटी इतका खर्च असलेले विमानतळ विकसित करण्यासाठी स्थापन झाली आहे. सिडको आणि राज्य शासन हे एनएमआयएएलचे भागीदार आहेत. एकूण 2268 हेक्टरवर उभारण्यात येणार्या विमानतळाचे गाभा क्षेत्र 1161 हेक्टर इतके आहे. भारतातील विमान वाहतूक क्षेत्र हे सर्वांत वेगाने विस्तारत आहे. देशांतर्गत हवाई वाहतुकीचे प्रमाण विचारात घेता अमेरिका आणि चीननंतर जगात तिसर्या क्रमांकावर भारत आहे. हवाई प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या 2000-01 या वर्षी 1.4 दशलक्ष इतकी होती. 2016-17 मध्ये त्यात वाढ होऊन ती 265 दशलक्ष इतकी झाली, तर 2030-31 पर्यंत ही संख्या 855 दशलक्ष प्रवासी इतकी असेल, असा अंदाज आहे. 2034 पर्यंत मुंबई महानगर क्षेत्रातील विमान प्रवाशांची संख्या 100 दशलक्ष इतकी असेल असा अंदाज राष्ट्रीय हवाई वाहतुकीबाबत वर्तवण्यात आला आहे.
स्वातंत्र्यानंतरचे भारतातील सर्वांत मोठे ‘ग्रीनफिल्ड’ विमानतळ असा लौकिक असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रति वर्ष 60 दशलक्ष प्रवासी संख्या हाताळू शकेल. या विमानतळाच्या उभारणीनंतर देशातील सर्वांत पहिली नागरी क्षेत्रातील बहुपर्यायी विमानतळ व्यवस्था मुंबई महानगर क्षेत्रात निर्माण होईल. योगायोगाने, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करणारी हैदराबादस्थित जीव्हीके इंडस्ट्रिज हीच सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचेही कामकाज पाहत आहे. ही दोन्ही विमानतळे शेअरड् टील बेसिस तत्त्वावर कार्यान्वित होतील.
मुंबईतील विमानतळावरील वाढत जाणार्या हवाई रहदारीच्या अतिरिक्त ताणाला मुक्त करण्याचा उद्देश असणारा हा प्रकल्प सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून उभारला जातो आहे. स्थानिक जनतेचे सहकार्य आणि महाराष्ट्र शासनाने दाखवलेली गती यातून लवकरच हा प्रकल्पपूर्ण होईल. नवी मुंबई विमानतळ प्रकल्प 2268 हेक्टर जमिनीवर उभारणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही दोन्ही शहरे मेट्रोने लवकरच जोडले जातील. त्यामुळे एकूणच या प्रकल्पामुळे नवी मुंबई शहराचे अर्थकारण बदलणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीचे पुढचे पाऊल आहे. कार्गो आणि प्रवासी वाहतुकीचे नवे पर्व यानिमित्ताने सुरू होतेय.
– विशाल मोरेकर
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9869448117