नवी मुंबई । मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 17 माध्यमिक शाळांचा सरासरी निकाल 88.99 टक्के लागला असून नमुंमपा माध्यमिक शाळा, नेरूळचा वैष्णव गंगाराम कोंडाळकर हा विद्यार्थी 94.60 टक्के संपादन करुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सर्वाधिक गुण संपादन करणारा विद्यार्थी ठरला आहे. माध्यमिक शाळा, करावे येथील रिश्वकुमार रवींद्र झा हा विद्यार्थी 92.60 टक्के गुण संपादन करुन महापालिका शाळांमध्ये व्दितीय तर पुनम पांडुरंग शिंदे ही माध्यमिक शाळा, सेक्टर 7, कोपरखैरणेची विद्यार्थिनी 90.80 टक्के गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
या वर्षीही महानगरपालिकेच्या 17 शाळांमधून 2116 विद्यार्थी दहावी बोर्ड परिक्षला बसले असून 88.99 टक्के इतका महानगरपालिका शाळांचा निकाल लागला आहे. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय दिघा, दिवाळे या शाळांचा निकाल 100 टक्के तसेच सानपाडा या शाळेचा – 95.45 टक्के, वाशी – 95.31 टक्के, शिरवणे – 94.24 टक्के, घणसोली – 94.04 टक्के, नेरुळ – 93.22 टक्के, कोपरखैरणे से. 7 – 92.98 टक्के, करावे – 92.85 टक्के, ऐरोली – 90.17 टक्के, तुर्भे गांव – 89.39 टक्के, से. 5 कौपरखैरणे – 83.77 टक्के, राबाडा – 83.33 टक्के, खैरणे – 82.89 टक्के, महापे – 81.13 टक्के, तुर्भे स्टोअर – 75.92 टक्के, श्रमिक नगर – 72.00 टक्के याप्रकारे निकाल लागला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील गुणवत्ता वाढीमध्ये सुट्यांच्या कालावधीत घेण्यात आलेल्या जादा तासिका तसेच विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सरावाचा मोठा वाटा आहे. तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणेच माध्यमिक शाळांतील इयत्ता 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांनाही मध्यान्ह भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने वर्गातील उपस्थितीमध्ये फरक पडला व अभ्यासातही मन एकाग्र करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून आला. याशिवाय शिक्षकांच्या विशेष प्रशिक्षण वर्गातूनही गुणवंत विद्यार्थी घडविण्याची मानसिकता वाढीवर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये सुसज्ज प्रयोगशाळांसह इतर भौतिक सुविधांमध्ये शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेली वाढ महत्वाची ठरली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी दिली.अशाचप्रकारे महानगरपालिकेचा इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र हा देशापरदेशात नावाजला जात असून या केंद्राचा निकाल 100 टक्के लागलेला आहे.