नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये उडाला स्वच्छतेचा बोजवारा

0

भटक्या श्‍वानांच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त; आरोग्य विभागाने कारवाई करण्याची नागरीकांची मागणी

नवी मुंबई । मनपाच्या हद्दीमध्ये भटक्या श्‍वानांच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त असतानाच याच श्‍वानांमुळे स्वच्छ भारत मिशनचाही फज्जा उडाला आहे. त्यामुळे भटक्या श्‍वानांवर आरोग्य विभागाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. देशभर स्वच्छ भारत अभियान जोरदारपणे सूरू आहे. प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचे काम सरकारी मदतीद्वारे मोठ्या प्रमाणात सुरु आहते. जे नागरिक उघड्यावर नैसर्गिक विधी उरकतात त्यांच्यावर आर्थिक दंडाची कारवाई करत असतानाच आता भटकी कुत्री रस्त्यावर, चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही कुत्रीच उघड्यावर नैसर्गिक विधी करत असल्यामुळे नवी मुंबई मनपाच्या हद्दीमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.

नसबंदी केल्यानंतर जिथून पकडले तेथेच पुन्हा सोडण्याचे संकेत
आपल्या घरात किंवा घरा लगत श्‍वान येऊ नयेत म्हणून चाळीतील नागरिकांनी एक अनोखी शक्कल राबविली आहे. एक प्लास्टिकची बाटली त्यामध्ये पाणी व लाल रंगाचे मिश्रण करून बाटली दरवाज्या जवळ बांधून ठेवली. यामुळें कुत्रा घरात व घर जवळ येत नाहीत. असे यामागचे कारण आहे. परंतु त्या बाटली मुळे कुत्रा घरा जवळ येत नसला तरी समोरील रस्त्यावर घाण करून जात असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त असल्याचे समाजसेवक मानू सकपाळ यांनी सांगितले. या बाबत पशु वैद्यकीय अधिकारी वैभव झुंझारे यांना विचारले असता, आम्ही नेहमीच कुत्र्यावर कारवाई करतो परंतु नस बंदी केल्या नंतर जिथून पकडले आहेत तेथेच पुन्हा सोडण्याचे संकेत शासनाचे असल्यामुळे पर्याय नसल्याचे सांगितले.

कुत्र्यांबाबत उपाय शोधण्याची मागणी
मनपाचा पशु विभाग नियमित भटक्या कुत्र्यांवर कारवाई करत असते. परंतु भटकी कुत्री पकडल्यानंतर त्या कुत्र्यावर नसबंदी करून जिथे पकडले तिथेच आणून सोडून दिले जात आहे. त्यामुळे स्वच्छतेचा गंभीर प्रश्‍न उभा राहिला आहे. हे कुत्रे रस्त्यावर किंवा इतरत्र ठिकाणी घाण करत असल्याने चुकून एखाद्याचा पाय पडला तर तो नागरिक तिथेच आपले पाय पुसून दुसर्‍या ठिकाणी घाण करत असल्याची अनेक उदाहरणे गावठाण व झोपडपट्टी परिसरात दिसून येत असल्याचे समाजसेवक मानू सकपाळ यांनी सांगितले.