पहिला टप्पा डिसेंबर 2019 अखेर पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा डिसेंबर 2019 अखेर पूर्ण होईल. त्यानंतर दोन ते अडीच वर्षात पूर्ण विमानतळाचे काम केले जाईल त्यामध्ये टर्मिनलची एक इमारत व एक रनवे यांचा समावेश असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित करताना या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गंभीरअसून 10 गावामधील लोकांचे योग्य पुनर्वसन करण्याची मागणी केली. प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडवू अशी आश्वासने अनेकदा मिळाली मात्र यासंदर्भी केवळ टोलवाटोलवी सुरू आहे, प्रश्न सुटलेले नाहीत असा आरोप केला. याबाबत स्पष्ट भूमिका घेऊन प्रकल्पग्रस्तांचे समाधानकारक पुनर्वसन होईल याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे असे चव्हाण यांनी सांगितले.
त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पामधील 98 टक्के प्रकल्पग्रस्तांनी संमतीने पुनर्वसन स्वीकारले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 50 लाख प्रवासी क्षमता असलेली टर्मिनल इमारत आणि एक रनवे यांचा समावेश आहे. डिसेंबर 2019 अखेर पहिला टप्पा पूर्ण होणार असून त्यानंतर दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीत दुसरा टप्पा पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्तांनी आपल्या भूखंडचा विकास केला तर विकास शुल्क घेतले जाणार नाही मात्र भूखंड विकला तर थर्ड पार्टीकडून मात्र पैसे घेतले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी धैर्यशील पाटील यांनी जमीन दिली म्हणून प्रकल्प होणार नाही तर यासाठी पाणी देखील लागणार असल्याचे सांगत इथे बाळगंगा मधून पाणी येणार असून ते धरणही सिडकोचे होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे बाळगंगा प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार का ? असाही सवाल केला. यावर मुख्यमंत्र्यांनी पडताळून पाहू व शक्य असेल तर विचार करू असे सांगितले. तसेच प्रशांत ठाकूर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या महसूल आयुक्तांच्या स्तरावर काही मागण्यांच्या फाईल अडकल्या असून याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली त्यावर मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.