नवी दिल्ली: पुण्याच्या कचरा कोंडीचा प्रश्न ऐरणीवर असतानाच देशातील स्वच्छ आणि अस्वच्छ शहरांची यादी जाहीर झाली आहे. केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2017 अंतर्गत ही स्वच्छ आणि अस्वच्छ शहरांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत मुंबई शहराचा समावेश नसला तरीही नवी मुंबई शहराचा मात्र देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत टॉप टेनमध्ये समावेश झाला आहे. स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई देशात आठव्या स्थानावर आहे. तसेच या यादीत पहिला क्रमांक मध्य प्रदेशातील इंदूर शहराने पटकवला आहे. तर अस्वच्छ शहरांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हे शहर दुसर्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा हे शहर सर्वात तळाला आहे. यंदा स्वच्छ सर्वेक्षणात 434 शहरांचा सहभाग होता. त्यात स्वच्छ शहरांमध्ये पहिल्या 50 पैकी 12 शहरे ही गुजरातमधली आहेत. तर उत्तर प्रदेश हे स्वच्छतेच्याबाबतीत सर्वात तळाला आहे. सर्वात अस्वच्छ शहरांमधे 20 शहरे ही एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत. अर्थात वाराणसीचा क्रमांक मात्र मागच्यावेळी 400 च्या घरात होता, तो यावेळी 32 वर आला आहे.
टॉप टेन स्वच्छ शहरे
इंदूर- मध्य प्रदेश, भोपाळ – मध्य प्रदेश, विशाखापट्टणम – आंध्र प्रदेश, सुरत- गुजरात, म्हैसूर- कर्नाटक तिरुचिरापल्ली- तामिळनाडू, नवी दिल्ली -, नवी मुंबई – महाराष्ट्र, तिरूपती – आंध्र प्रदेश, बडोदा- गुजरात नवी मुंबई कसे बनले स्वच्छ?
गेल्या दोन वर्षात नवी मुंबई महापालिकेने राबवलेल्या विविध योजनांमुळे हा पुरस्कार पालिकेला मिळालेला आहे. यामध्ये संपूर्ण शहरात शौचालये उभारणे, शहरातील घणकचर्याचे योग्य नियोजन, भिंतींना पेटिंग करणे, रस्त्यालगतच्या उद्यानांचे सुशोभिकरण करणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. शहर हागणदारीमुक्त बनवण्यासाठी 1950 वैयक्तिक, 666 कम्युनिटी आणि 80 सार्वजनिक शौचालयांची उभारणी पालिकेने केली आहे. शहरातून जाणारे सायन-पनवेल हायवे, पाम बीच रोड, ठाणे- बेलापूर हायवेवर ई-टॉयलेटची उभारणी करून वाहतुकदारांची सोय केली.
शहरात दररोज 750 मेट्रिक टन घणकचरा गोळा होतो. यामध्ये ओला आणि सुका कचरा एकत्र होत असल्याने त्याचे वर्गीकरण करणे अवघड झाले होते. त्यामुळे प्रत्येक सोसायटींना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे आदेश पालिकेने दिले होते. ज्या सोसायट्या हा नियम पाळत नव्हत्या त्यांचा कचरा उचलणे बंद केल्यानंतर रहिवाशांनी ओला-सुका कचरा वेगळा करण्यास सुरुवात केली. यातून 150 मेट्रिक टन ओला कचरा वेगळा झाल्याने त्याच्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्यात आली. तर सुक्या कचर्यातून प्लास्टिक वेगळे करून त्याचा पुर्नवापर करण्यात येत आहे.
शहर स्वच्छ दिसतानाच आकर्षक होण्यासाठी पालिकेने महत्वाचे चौक, रस्ते, उद्यानांच्या भिंती रंगवल्या. या भिंतीवर प्राण्यांची, पक्षांची आकर्षक चित्रे काढली. तर काही ठिकाणी समाज प्रबोधनात्मक वाक्ये, संदेश लिहून जनजागृती केली. रस्त्यांच्या दुजाभकांवर उद्याने उभे करून, झाडे लावून सुशोभिकरण करण्यात आले आहे. यामुळेच नवी मुंबईला टॉप टेनमध्ये स्थान प्राप्त झाले आहे.