नवी संघटना अन भरकटलेले सदाभाऊ!

0

एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं आणि शेतकरी आंदोलनातून शासनात आलेलं नाव म्हणजे सदाभाऊ खोत. शेतकर्‍यांसाठी कित्येकदा रास्ता रोको आणि तत्सम प्रकारची आंदोलने करून कित्येक वेळा जेलमध्ये जाऊन आलेले सदाभाऊ शासनात आज मंत्री आहेत. अर्थातच सदाभाऊ मंत्री झाले ते अर्थातच खा. राजू शेट्टी यांच्यामुळे. अर्थात केवळ उपकार म्हणून शेट्टी यांनी सदाभाऊंना मंत्रिपद दिलेले नाही. यासाठी सदाभाऊ यांनी स्वभिमानीसाठी केलेली ’अफाट’ मेहनत देखील महत्वाची आहेच. सदाभाऊंच्या सरकारी बंगल्यात गेल्यावर भिंतीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, त्यांचे सध्याचे तारणहार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्यांच्यामुळे आंदोलनात आले ते स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी यांच्या मोठ-मोठ्या तसबिरी लावलेल्या दिसतात. अर्थात सगळ्याच मंत्र्यांच्या दालनात अशा ’आदर्श’ असणार्‍या मार्गदर्शकांच्या प्रतिमा लावलेल्या असतात. मात्र सदाभाऊंच्या बंगल्यात अजून एक तसबीर आहे जी प्रत्येकाचे ध्यानाकर्षण करते. चळवळीतून राजकारणाच्या प्रवाहात आलेल्या तीन मित्रांची ही प्रतिमा आहे. खा. राजू शेट्टी, ना. महादेव जानकर आणि सदाभाऊ यांची हात गळ्यात टाकून अतिशय सुरेख हसतानाचा हा फोटो पाहून ही दोस्ती किती जबरी होती याचा प्रत्यय पाहणार्‍यांना येतो. धडाकेबाज चित्रपटातील ’ही दोस्ती तुटायची नाय’ या गाण्याच्या ओळी खाली लिहिल्यात. तिघांच्या चळवळीतील धडाकेबाज कारकिर्दीची आठवनच हा फोटो करून देतो.

शेतकरी आंदोलनातून उभरलेले नेतृत्व ते मंत्रिपद असा स्वप्नवत प्रवास केलेले कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत स्वाभिमानी आणि खा. राजू शेट्टी यांना सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चेला अखेर 8 सप्टेंबरला ऑफिशियल पूर्णविराम मिळाला. शेतकर्‍यांसाठी आंदोलन पेटले असताना राजू शेट्टी सरकारी धोरणांच्या विरोधात आवाज उठवीत असताना सदाभाऊ मात्र मुख्यमंत्र्यांची बाजू सांभाळून घेत सत्तेत राहण्याचा आपला सेफ झोन मजबूत करण्यात व्यस्त दिसून आले. सोशल मीडियात खा. शेट्टी आणि खोत यांच्यातील पर्सनलवर आलेले लेटर वॉर जोरदार गाजले. मोक्याच्या क्षणी सदाभाऊंची सत्तेच्या सोयीची भूमिका खा. शेट्टी आणि कार्यकर्त्यांना दुखावणारी ठरली. आणि मग चौकशी समिती वगैरे बसवून सदाभाऊंची कायदेशीर हकालपट्टी झाली. दरम्यान सदाभाऊ शेतकरी संपासोबत त्यांच्यावर लागलेल्या बलात्काराच्या आरोपाने प्रचंड बॅकफूटवर आले.

दरम्यान त्यांनी नव्या संघटनेचे बिगुल वाजवले. 21 तारखेला संघटनेची घटस्थापना होईल. मात्र नवनिर्मितीची उत्साह खुद्द सदाभाऊंच्या चेहर्‍यावरच यावेळी दिसून येत होता. राहून-राहून त्यांच्या रुपात विनायक मेटे दिसून येत होते, अशी चर्चाही परिषदस्थळी रंगली होती. नव्या संघटनेच्या अजेंड्याऐवजी शेट्टी यांच्यावर टीका करण्यातच त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सची हवा गुल झालेली दिसली. राजू शेट्टींवर टीका करताना ते शेट्टी किती मजबूत आहेत याचीच प्रचिती देत होते असं भासत होतं. शेट्टी मजबूत आणि नियोजनबद्ध असल्याचे दरम्याच्या काळात अधोरेखित होत असताना सदाभाऊ मात्र स्वताहून मागे पडत गेले. खासदार राजू शेट्टी यांनी सांगली जि.प. डीपीसी निवडणुकीत केवळ एका सदस्याच्या जीवावर चाणक्यनितीनं भाजप, कॉग्रेस, राष्ट्रवादी आणि सदाभाऊंची रयत विकास अशा सर्वपक्षीय आघाडीचा पराभव करत स्वत:चा एकमेव उमेदवार निवडून आणला. सदाभाऊंकडे हा धीरोधात्तपणा जाणवला नाही. भाजप आमदार आणि मंत्री असलेले सदाभाऊ नवी संघटना काढून नेमका दबाव कुणावर आणणार हे पाहण्याजोगे असेल. एक मात्र नक्की सदाभाऊ यांचा विनायक मेटे बनण्याकडेचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे.

-निलेश झालटे
मंत्रालय रिपोर्टर, जनशक्ति, मुंबई
9822721292