नवी सांगवी: प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत येथील फेमस चौकात कॉवर्स टेक समृद्धी कम्युनिकेशनतर्फे कौशल्य विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या मेळाव्यास पुणे येथील व्यवसाय शिक्षण प्रशिक्षणचे सहसंचालक चंद्रकात निनाळे, नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, सागर अंघोळकर, संयोजक अविनाश माळी आदींसह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
चीन व कोरियात व्यावसायिकतेला प्राधान्य
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकात निनाळे म्हणाले, आपल्या भारत देशात नवनिर्मिती व कौशल्य विकासास प्राधान्य दिल्याने आपण मोठ्या आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहोत. 1970 च्या दशकापर्यंत भारत, कोरिया व चीन या देशांची आर्थिक पातळी सारखीच होती. परंतु त्यानंतर चीन व कोरिया या दोन देशांनी कौशल्य व व्यावसायिक शिक्षणाचा अंगीकार केला. त्यामुळे आज ते आपल्यापेक्षा चाळीस पट श्रीमंत झाले, असे त्यांनी सांगितले.
व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व द्या
आज कोरियात 96 टक्के तर चीन मध्ये 65 टक्के व्यावसायिक शिक्षण दिले जाते. एकट्या चीनमध्ये 250 व्यावसायिक शिक्षणाची विद्यापीठे आहेत. उत्तरप्रदेशात शिपाईच्या 17 जागांसाठी शासनाने जाहिरात दिली असता त्यासाठी 23 लाख अर्ज आले. छाननीत त्यापैकी 14 लाख पदवीधर निघाले तर 207 लोक पीएचडी करीत असल्याचे दिसले. त्यामुळे अशा शिक्षणापेक्षा व्यावसायिक शिक्षण घेतले तर नोकरी मिळतेच; परंतु स्वतःचा स्वयंरोजगार करून दुसर्यांना नोकरी देता येते. म्हणून व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व द्यावे, असे निनाळे यांनी सांगितले. यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना इंन्डक्शन कीट व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश माळी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रमेश पाटील यांनी तर आभार ज्योती माळी यांनी मानले.