नवे सण, नवे उत्सव!

0

तरुणांच्या ओठावर कोणत्या प्रकारची गाणी असतात त्यावरून त्या देशाचे भवितव्य ओळखता येते, त्याचप्रमाणे तुम्ही कोणते सण, उत्सव साजरा करता यावरही तुम्ही कशाप्रकारे विचार करता हेही दिसून येते. तंत्रज्ञानाच्या जोरावर जग जवळ येत असताना सर्वसमावेशक असणे, व्यापक भूमिका घेणे हे अधिक गरजेचे आहे. जात धर्म याच्या पलीकडे जाऊन पहिल्यांदा देशाचा विचार केला पाहिजे, असे आपण किती ही बोलत, लिहीत असलो, तरी रोजच्या आयुष्यात मात्र आपले प्राधान्यक्रम वेगळे असतात. आपले सण, उत्सव आपण कशाप्रकारे साजरे करतो यावर आपण देशाचे किती आणि जाती, धर्माचे किती हे लक्षात येते. देश म्हणजे डोंगर, नदी, माती नव्हे तर माणसांनी देश बनतो. हा देश उभा करताना ज्या महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी आपले आयुष्य पणाला लावले त्यांना समजून घेणे, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे असे हे सण, उत्सव!

हवे तर त्याला राष्ट्रीय किंवा सामाजिक सण म्हणू या. वर्षभर आपण अनेक धार्मिक सण, उत्सव साजरे करत असतो. ते करू नये असे कोणी सांगणार नाही.संविधानाने ते स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेले आहे. पण राष्ट्रीय सणातही आपला सहभाग वाढवला पाहिजे.26 नोव्हेंबर हा संविधान दिवस देशभर साजरा केला गेला. 26 नोव्हेंबर 1949 साली भारताची घटना लिहून अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रति अर्पण करण्यात आली. आज हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो आहे. यंदा मुंबई, पुणे आदी शहरामध्ये तो उत्सवी स्वरूपात साजरा केला गेला.दोन महिने त्याची तयारी केली गेली. संविधान समजून घेण्यासाठी केलेला तो प्रयत्न होता.

9 ऑगस्ट 1942 ला गांधीजींनी ब्रिटिशांना छोडो भारतचा नारा दिला. त्या घटनेला यंदा पंचाहत्तर वर्षे झाली. बेचाळीसच्या आंदोलनानंतर ब्रिटिश सत्तेला जाणीव झाली की, आता आपण जास्त काळ भारतावर राज्य करू शकणार नाही. हा दिवस आपण समजून घेतला पाहिजे. अनेक मंडळी या दिवशी अनेक कार्यक्रम करतात. 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिवस. हाही दिवस केवळ सरकारी कार्यक्रम न होता घराघरांमध्ये सणासारखा साजरा केला पाहिजे. स्वातंत्र्याची किंमत देशाने मोजली आहे. संघर्षातून स्वातंत्र्य मिळाले आहे.ते जपण्याची आणि समजून घेण्याची आपली जबाबदारी आहे. नव्या वर्षाच्या पहिला सण 3 जानेवारीला येतोय.सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस. हा दिवस काही संघटना, व्यक्ती सावित्री उत्सव म्हणून साजरा करतात. 160 वर्षांपूर्वी शेणा, दगडांचा मारा झेलत ती बिकट वाट चालत राहिली, म्हणून आज आपण त्याच वाटेवरून ताठ मानेने चालू शकतो. तिच्या परी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. दिवाळी सणाप्रमाणे या दिवशी घरात गोडधोड करण्याचा दिवस. दारात आकाश दिवे, रांगोळी, फुलांचे तोरण आणि ज्ञानाची एक मिणमिणती पणती एवढं आपण नक्कीच करू शकतो. सावित्रीमाईचा जन्मदिवस घराघरांतून साजरा केला पाहिजे, ती आपली सर्वांची जबाबदारी आहे. नवरात्रामध्ये नऊ रंगांच्या साड्या नऊ दिवस नेसणार्‍या महिला, एक दिवस का होईना सावित्रीचा जन्म दिवस साजरा करतीलच. स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या राजांनी रोवली, रयतेचे राज्य निर्माण केले, त्या छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी यांच्या विचारांचा जागर घालायलाच हवा आणि तो लोकांनीच नवनव्या कल्पना लढवून, उत्सवी स्वरूपात साजरा करायला हवा. केवळ 15 ऑगस्ट तसेच 26 जानेवारीला मोठमोठ्यानी लाऊडस्पीकर लावून देशभक्तीपर गीतांनी साजरा न करता आपला देश प्रगतिपथावर जाईल या दृष्टीने सण, उत्सव साजरे करायला हवे. सण, उत्सव तसेच महोत्सव यासाठी कोणतीही उधळपट्टी करू नये, असे आदेश राज्य सरकारने सर्व महापालिकांना दिले आहेत. पालिकांकडून सण, उत्सवांवर केल्या जाणार्‍या उधळपट्टीची गंभीर दखल घेऊन हायकोर्टाने राज्य सरकारचे कान टोचल्याने सरकारने हे आदेश काढले आहेत.

– शरद कदम
अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल,मुंबई
9224576702