नवोदय विद्यालयात रॅगिंग करणार्या दोघा विद्यार्थ्यांचे निलंबन
जिल्हाधिकार्यांकडे तक्रार : जिल्ह्यातील विद्यालयांसह महाविद्यालयांमध्ये अँन्टी रॅगिंग समिती स्थापण्याबाबत लवकरच आढावा बैठक
Ragging of class 10 students in Jawahar Navodaya Vidyalaya in Bhusawal : Suspension of two, MLA Chandrakant Patil Reviewed भुसावळ : शहरातील जवाहर नवोदय विद्यालयातील दहावीच्या वर्गातील मुलांना बारावीच्या वर्गातील मुलांनी रॅगिंग करीत मारहाण करण्याची गंभीर घटना मंगळवार, 4 ऑक्टोंबर रात्री 10.30 वाजता घडली होती. पालकांना ही गंभीर बाब कळाल्यानंतर विद्यालय प्रशासनाने दोषींवर कारवाई करण्याऐवजी घडल्या प्रकारावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र माध्यमांनी याबाबत लक्ष वेधल्यानंतर मारहाण करणार्या दोन विद्यार्थ्यांना अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती प्राचार्य आर.आर.खंडारे यांनी दिली. दरम्यान, रॅगिंगच्या अनुषंगाने सोमवारी दुपारी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नवोदय विद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकार्यांकडे त्यांना घडल्या बाबीची कल्पना दिली तसेच जिल्ह्यातील सर्वच विद्यालय व महाविद्यालयांमध्ये अँटी रॅगिंग कमेटी आहे वा नाही या संदर्भात आढावा बैठक लावण्याच्या सूचना केल्या.
तीन तास केली विद्यार्थ्यांना मारहाण
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले की, मंगळवार, 4 ऑक्टोबर रोजी जवाहर नवोदय विद्यालयात रात्री 10.30 वाजेच्या सुमारास बारावीच्या वर्गातील मुलांनी दहावीच्या वर्गातील मुलांची रॅगिंग करण्यास सुरवात केली. रॅगिंगमध्ये सुमारे सहा विद्यार्थ्यांना बारावीच्या वर्गातील मुलांनी जबर मारहाण केली. ही मारहाण तब्बल तीन तास म्हणजे रात्री 1.30 वाजेपर्यत सुरू होती. तक्रारकर्त्यांनी पोलिसांना दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की, माझ्या मुलास खाली झोपवून त्यास अमानुष मारहाण करण्यात आली. त्याच्या तोंडावर चप्पलेने तोव पाठीवर सुध्दा जबर मारण्यात करण्यात आली. रात्रीच्या वेळी विद्यालयाचे गेट बंद असल्याने रात्री हा प्रकार बाहेर येऊ शकला नाही.
प्राचार्यांनी प्रकरण दडपल्याचा आरोप
शाळेच्या मैदानावर दुसर्या दिवशी बुधवार, 5 ऑक्टोबर विद्यार्थ्यांनी हा प्रकार प्राचार्य आर.आर.खंडारे यांना सांगितला मात्र त्यांनी मारहाण करणार्या दोन्हींवर कारवाई केली नाही. उलट या प्रकरणाची बाहेर वाच्यता करू नका, नाही, माझी केवळ चार महिने नोकरी बाकी आहे, शाळेचे नाव खराब होईल, तुमचे नुकसान होईल, असे मुलांना धमकावून शांत बसण्यास भाग पाडण्यात आले. घडलेल्या प्रकाराची माहिती जखमी असलेल्या मुलांच्या पालकांना सुध्दा सांगण्यात आली नाही.
पाच दिवसानंतर घटनेचा प्रकार उघडकीस
बारावीतील ज्या मुलांनी मारहाण केली होती, त्या मुलांच्या पालकांनी दहावीतील ज्या मुलास अधिक मार लागला आहे, त्याच्या पालकांना फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती देत माफी मागितली. आमच्या मुलांकडून चुक झाली आहे, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे जखमी मुलाचे पालकांनी तत्काळ भुसावळ विद्यालय गाठले. मुलाची भेट घेतली. प्राचार्यांशी चर्चा केली मात्र असा प्रकारच घडला नाही, असे प्राचार्यांनी अजब उत्तर दिल्याचा दावा पालकांनी केला.
सात दिवसात अहवाल द्या अन्यथा गुन्हा दाखल होणार
भुसावळ सारख्या लहानश्या गावात रॅगिंगची घटना घडल्याने या गंभीर प्रकरणाची दखल डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी घेतली आहे. जखमी मुलाच्या पालकांची तक्रार अर्ज दिल्यानंतर प्रकरणी प्राचार्य एस.एस.खंडारे यांना त्यांनी लेखी पत्र देत अवघ्या सात दिवसात या प्रकरणाचा लेखी अहवाल पाठवावा, जर अहवाल प्राप्त झाला नाही तर या प्रकरणात तुम्हालाही संशयीत आरोपी केले जाईल, असेही पोलिस उपअधीक्षकांनी बजावले आहे.
आमदार चंद्रकांत पाटलांनी साधला संवाद
रविवारी प्राचार्यांची भेट न झाल्याने आमदार चंद्रकांत पाटील माघारी फिरले होते मात्र सोमवारी दुपारी त्यांनी जवाहर नवोदय विद्यालयास भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रॅगिंग सारखा प्रकार गंभीर असून शाळा प्रशासन दखल घेत नसल्यास थेट आमच्याकडे तक्रार करा, असे आमदारांनी विद्यार्थ्यांना सांगितले तसेच त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी उपस्थित होते.
अत्यंत दुर्दैवी प्रकार : आढावा बैठक घेणार
नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांचे रॅगिंग होण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रॅगिंगमुळे अनेकांचे जीव गेल्याने रॅगिंगसारख्या दुर्दैवी घटना यापुढे होवू नये यासाठी जिल्हाधिकार्यांशी आज दुपारी बैठकीत चर्चा केली. जिल्ह्यातील सर्वच विद्यालय तसेच महाविद्यालयात अँटी रॅगिंग समिती आहे वा नाही, असल्यास त्याचा नियमित आढावा घेतला जातो का नाही? याबाबत चर्चा करण्यात आली व लवकरच जिल्हाधिकारी या संदर्भात बैठक घेवून उपाययोजना करणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.