नवोदित कवी, लेखकांसाठी नीलपुष्पच्या वतीने व्यासपीठ

0

ठाणे। नवोदित कवी, लेखक आणि गायककलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून, त्यांच्या कलात्मक सृजनाला वाव देण्यासाठी नीलपुष्प साहित्य मंडळाची 24 वर्षां पूर्वी निर्मिती झाली. परंतु, नीलपष्पच्या या साहित्य, कलेच्या वाटचालीत, ठाणेभूषण कवी डॉ. नारायण तांबे यांनी सुरुवातीपासूनच मोठे योगदान देऊ केले. कवी, लेखक, गायक कलाकारांना साहित्य, कला वर्तुळात प्रसिद्धी मिळत गेली तसेच अनेक प्रतिभावान नवनवीन कवी लेखक या संस्थेत सामील झाले. या नीलपुष्प साहित्य मंडळाचा काव्यसोहळा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारीही ठाण्याच्या रघुनाथ नगर येथील आनंदविश्‍व गुरुकुल महाविद्यालयात दिमाखात संपन्न झाला. यावेळी मंच्यावर डॉ. नारायण तांबे, उपाध्यक्षा कवयित्री ज्योती गोसावी, कवी रवींद्र कारेकर, डॉ. शरद घाटे, कवयित्री सुधा मोकाशी, वैदेही केवटे हे मान्यवर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

या काव्य सोहळ्यात विषयाचे कोणतेही बंधन नसल्याने कवी, कवयित्रींनी विविधांगी विषयांवर आपल्या काव्यरचना सादर केल्या. यात प्रमीला पाटील यांनी ’उपदेश’ ही मानवतेची शिकवन देणारी कविता सदर करुन व्हा… व्हा… मिळवली. दीनदुबळ्यांच्या घरी तू येत का नाही आल्ला हे गाणं कीर्ती खांडे या बालीकेने गायले. शशिकांत वरखडे, धनंजय सरोदे यांनी ’पांडुरंग पांडुरंग’ व ’चंद्रभागेच्या तीरी’ या कविता दोघांनी छान गायकीने पेश करत सर्वांचे मन गुंगवले. परशुराम नेहे यांनी ’झाले मी मोकळी’ ही स्त्रियांच्या भावभावनेवर आधारित कविता सुंदररीत्या सादर केली. रवींद्र कारेकर यांनी चारोळ्यांच्या अप्रतिम भावलहरी संवादी शैलीत मांडून मनामनांना जिंकले.

रसिक मंत्रमुग्ध
डॉ. शरद घाटे यांनी बाल कविता सादर केली. रोहिणी वावीकर या कवयित्रीने ’वय वर्ष 50’ ही कविता भावपूर्णतेने व्यक्त करत काव्यरसिकांना आनंदून टाकले. रुपेश पवारांनी ’गोडवा’ ही थंडीवरची प्रभातीची रंग छटा दाखवून एका अनोख्या ढंगात कविता पेश करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गायक गौरव सोनावणे यांनी ’तोच चंद्रमा नभात’ गीत गायले. ‘शारद सुंदर चंदेरी त्राती’ हे शांताबाई शेळके यांचे गीत गायिका अश्‍विनी देशपांडे यांनी गायले.