नवोदित मुंबई श्री 24 नोव्हेंबरला

0

मुंबई । ग्रेटर मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेतर्फे 24 नोव्हेंबर रोजी नवोदित मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लालबागच्या गणेश गल्लीत रंगणार्‍या या शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबापुरीतील 200 हुन अधिक शरीरसौष्ठवपटू सहभागी होतील अशी आशा संयोजकांनी व्यक्त केली आहे.

नवोदित मुंबई श्री किताब विजेत्याला 11 हजार रुपयांच्या रोख पुरस्काराने गौरवले जाईल, अशी माहिती बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय (नंदू) खानविलकर यांनी दिली. तसेच 55, 60, 65, 70, 75, 80 आणि 80 किलोवरील वजनी गट अशा एकंदर सात वजनी गटात रंगणार्‍या या स्पर्धेतील प्रत्येक गटात पहिल्या पाच क्रमांकाना 3,2.5, 2, 1.5 आणि 1 हजाराचे रोख बक्षिसे दिले जाणार असल्याचे मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर यांनी सांगितले. नवोदित मुंबई श्री स्पर्धेत 200 पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभागी होतील अशी आशा असल्यामुळे संघटनेने 23 नोव्हेंबरला दुपारी 3 ते 5 यावेळेत अंधेरी पूर्वेकडील पंपहाऊज येथील फॉरच्युन फिटनेस येथे वजन तपासणीचे आयोजन केले आहे. याकरिता इच्छुक स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी केले आहे. वेळेवर पोहोचू न शकणार्‍या स्पर्धकाला स्पर्धेला मुकावे लागेल, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 9867209971, 9223348568 या क्रमांकावर संपर्क साधावा , असे आवाहन उपनगर संघटनेचे सरचिटणीस सुनील शेगडे यांनी सर्व खेळाडूंना केले आहे.