पुणे । शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असून, भावी काळाची आव्हाने पेलणारी, पुढच्या पिढीचे प्रश्न सोडवणारी शिक्षणपद्धती निर्माण करावी लागेल. सर्वांना प्रगतीची समान संधी दिली तरच देशाची प्रगती होईल, असे मत भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले. ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ व ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या वतीने आयोजित ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’चे वितरण डॉ. साळुंखे यांच्या हस्ते झाले. गतीमान प्रशासनाचे प्रयोग करणारे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महाराष्ट्राचे पहिले मतपोर्टल ‘बिगुल’चे संपादक मुकेश माचकर, ज्ञान प्रबोधिनी, स्त्री शक्ती प्रबोधन प्रमुख सुवर्णा गोखले, डॉ. व्ही. एन. जगताप आणि खतीब अजाझ हुसेन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. एस. एन. पठाण, अन्वर राजन, सारिका रोजेकर व सचिन सूर्यवंशी आदी उपस्थित होते. पुरस्काराचे यंदा नववे वर्ष होते. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व शाल असे या सन्मानाचे स्वरूप होते. चंद्रकांत दळवी, डॉ. व्ही. एन. जगताप यांनी पुरस्काराची रक्कम समाजोपयोगी कामासाठी संस्थेकडे सुपूर्द केली.
सध्याची शिक्षणपद्धती ही डाव्या मेंदूची
डॉ. साळुंखे म्हणाले, सध्याची शिक्षणपद्धती ही डाव्या मेंदूला कामाला लावणारी आहे. मात्र, संशोधनासह अनेक महत्त्वपूर्ण कामांसाठी उजवा मेंदू वापरला जाणे आवश्यक आहे. लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शक पत्रकारितेला प्रोत्साहन देणे, स्त्रियांना विकासाची समान संधी देणे आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकासाचे मॉडेल उभारणे यासाठी कार्य करणार्यांना या सन्मान सोहळ्यात गौरविण्यात आले. हा अत्यंत आगळावेगळा उपक्रम आहे, समुहाची आणि समाजाची कार्यक्षमता, गुणवत्ता वाढविण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतील, असेही ते म्हणाले.
अधिक काम करायला बळ
दळवी म्हणाले, या सामाजिक कृतज्ञता सन्मानामुळे अधिक काम करायला बळ मिळाले आहे. डॉ.पी.ए. इनामदार हे मागे पडलेल्या समाजाला शिक्षणाद्वारे पुढे आणण्यासाठी उच्चकोटीचे काम करीत आहेत. आदराने पाहावे असे हे व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या नावाचा सामाजिक कृतज्ञता सन्मान मिळाल्याचा आनंद वाटतो. दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले. एमसीई सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम यांनी आभार मानले.