नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाला ‘सीएम अपॉइण्टमेंट’ची प्रतीक्षा!

0

सहा मजली पर्यावरणपूरक इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळच नाही?

पुणे : पुण्यातील ससून चौकात उभारण्यात आलेले नवे जिल्हाधिकारी कार्यालय अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या सहा मजली व 67 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अद्याप वेळच मिळालेला नाही. त्यामुळे उद्घाटन रखडले आहे. अत्यंत सुंदर आणि पर्यावरणपूरक असलेली ही इमारत पुण्याच्या वैभवात भर टाकणारी असून, इमारतीचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झालेले आहे. किरकोळ अंतर्गत सजावटीचे काम बाकी आहे. रविवारीच उद्घाटन समारंभ घेण्यासाठी अधिकारीवर्गाचा हट्ट पाहाता, मुख्यमंत्र्यांकडून रविवारची तारीख काही उपलब्ध होत नाही, अशी मोठी अडचण आहे. तरीही ऑक्टोबरच्या मध्यात या शानदार जिल्हाधिकारी कार्यालयाचा उद्घाटन समारंभ नक्कीच पार पडेल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्राने दिली आहे.

ऑक्टोबरच्या मध्यात उद्घाटनाचा मुहूर्त!
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ही तब्बल 134 वर्षे जुनी व इंग्रजकालीन आहे. तरीही ती सुस्थितीत असून, सरकारने ती ऐतिहासिक वारसा म्हणून निर्देशित केलेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय कार्यालयांसाठी ससून चौकात तब्बल 67 कोटी रुपये खर्च करून सहा मजली अशी पर्यावरणपूरक सुंदर इमारत बांधण्यात आलेली आहे. या इमारतीत लवकरच प्रशासकीय कार्यालयांसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे. इमारत पूर्णपणे तयार झालेली असून, किरकोळ अंतर्गत सजावटीचे काम बाकी आहे. तेही गतीने पूर्ण केले जात आहे. काही कामासाठी अद्याप 11 कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याची माहितीही अधिकारीवर्गाने दिली. हा निधी डिसेंबरच्या प्रशासकीय खर्चातून मिळून जाईल, त्यामुळे ते कामही वेगाने हाती घेण्यात आलेले आहे. इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते तातडीने पार पाडले जावे, यासाठी जिल्हाधिकारी, पालकमंत्री व इतर प्रशासकीय अधिकारी प्रयत्न करत आहेत. परंतु, हा उद्घाटन सोहळा रविवारीच घेण्यात यावा, असा आग्रह असल्याने रविवारची तारीख काही मुख्यमंत्र्यांकडून मिळत नाही. तरीही पुढील महिन्यात व ऑक्टोबरच्या मध्याची तारीख देण्यास मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ) तयार झालेले आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये नक्कीच या सुंदर इमारतीचे उद्घाटन होईल, अशी माहितीही अधिकारी सूत्राने दिली.

बंडगार्डन पोलिस ठाणे हलविणार!
या प्रशासकीय इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार हे स्टेट बँक ऑफ इंडिया व बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या बाजूने आहे. प्रवेशद्वाराला अडथळा ठरणारे बंडगार्डन पोलिस ठाणे इतरत्र हलविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. तसेच, प्रशासकीय अधिकारी व पोलिस अधिकारी यांच्यातही याबाबत चर्चा झाली असल्याचे अधिकारी सूत्राने सांगितले. त्यासाठी महसूल विभागाच्यावतीने दुसरी शासकीय जागाही पोलिस ठाण्यासाठी देण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. ससून रुग्णालयाच्या जवळ असलेल्या या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसाठी सहज प्रवेशमार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या स्थलांतरणासाठी जिल्हा परिषद इमारतीजवळील शासकीय जागेचा प्रस्तावही ठेवण्यात आलेला आहे. तथापि, याबाबत अधिकृतरित्या धोरण निश्चित करण्यात आलेले नव्हते. पोलिस सूत्राच्या माहितीनुसार, हा प्रस्ताव सद्या वरिष्ठपातळीवर तपासला जात असून, लवकरच त्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.

इमारतीला अद्याप एनओसी नाही!
सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने ही अतिशय सुंदर इमारत बांधण्यात आली असून, सहाय्यक अभियंता विनय कुलथे यांच्या नेतृत्वात उभारणीचे काम पूर्ण होत आहे. पुणे महापालिकेकडून अद्याप इमारतीसाठी पूर्णत्वाचा दाखला व इतर नाहरकत प्रमाणपत्रे देण्यात आलेली नाहीत. लवकरच सर्व प्रशासकीय कारवाई पूर्ण होईल, अशी माहितीही महसूल विभागाच्यावतीने देण्यात आली. नव्या इमारतीच्या उभारणीवेळी प्रशासकीय इमारतीची जुनी रचना मात्र कायम ठेवण्यात आली असून, ही इमारत पूर्णपणे पर्यावरणपूरक अशी बनविण्यात आलेली आहे. तसेच, ससून रुग्णालयाशेजारीच ती असल्याने जिल्हाभरातून येणार्‍या नागरिकांसाठी ती सोयीस्कर अशी ठरलेली आहे.