पुणे । तंत्रज्ञानामध्ये वेगाने बदल होत आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे 55 नवीन प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. 3-डी प्रिंटिंग, रोबोटीक प्रोसेस आटोमोशन, रिटेल डाटा अनालिस्ट, इंटरनेट, मोबाईल आदींमधील नव्या संधींचा वेध घ्या, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 112व्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र. कुलगुरू डॉ. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. शाळीग्राम, संचालक डॉ. चव्हाण, अधिष्ठाता विजय खरे, व्ही. बी. गायकवाड, प्रा. प्रफुल्ल पवार, दीपक माने उपस्थित होते. विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविज्ञान, अंतर-विद्याशाखीय अभ्यास या विद्याशाखांतील परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या व तेथे उपस्थित असलेल्या तसेच अनुपस्थितीत राहून पदवी घेणार्या सर्व स्नातकांना पदव्या आणि पदविका प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या 162 स्नातकांना, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या 80 स्नातकांना, मानवविज्ञान विद्याशाखेच्या 94 स्नातकांना, अंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या 11 स्नातकास पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.