नववर्षाच्या सुरुवातीला भीमा कोरेगाव दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्रातील दलित चळवळ आता नवे वळण घेत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची तुलना बिहारमध्ये झालेल्या त्रिवेणी संघ प्रयोगसारखी असल्याचे काही राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्त्यांचे मत आहे. त्रिवेणी संघ प्रयोगात मागासवर्गीय जातींच्या समुदायाने उच्चवर्णीय समाजाविरुद्ध आपली शक्ती एकत्रित केली होती. भीमा कोरेगाव युद्धासंदर्भात काही हिंदू संघटना आणि दलित इतिहासाकारांमध्ये मतभिन्नता आहे. दलितांच्या मते ही लढाई जातीयवादी पेशव्यांविरोधात झाली होती, तर उजव्या बाजूचे इतिहासकार ही लढाई इंग्रजांविरुद्धची होती असे म्हणतात.
राज्यातले दलित नेते या घटनेकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत. पण राष्ट्रीय पातळीवर या घटनेचे वेगळे विश्लेषण केले जात आहे. राजधानीतील दलित समुदायातील विचारक आणि दलितांसाठी देशभर मानवाधिकार मोहीम राबवणारे पॉल दिवाकर यांनी सांगितले की, भीमा कोरेगाव प्रकरणाकडे दोन दृष्टीने पाहिले पाहिजे. एक म्हणजे ही लढाई ब्रिटिशांनी आपली ताकद वाढवण्यासाठी केली आणि दुसरी म्हणजे शेतकरी, कष्टकरी कामगारांना एकत्र करून त्यांच्या लढ्याला मार्ग दाखवणे. भीमा कोरेगावसंदर्भात 1 जानेवारीला घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतरच्या घटनाक्रमामुळे महाराष्ट्रात एक त्रिवेणी संघ तयार होत आहे. बिहारमध्ये 1930 साली उच्चवर्णीयांविरोधात यादव- कोईरी आणि कुर्मी समुदाय एकत्र आले होते. हा गट तयार झाल्यामुळे त्यावेळी बिहारमधील सामाजिक आणि राजकीय समीकरणे बदलली होती. दिवाकर यांच्या मते भाजप, मातंग आणि शिवसेना महार समाजाचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाले आहे. त्याचवेळी या जातीपातीच्या राजकारणात काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. 1 जानेवारीनंतर महाराष्ट्रात बदलेली परिस्थिती एका जातीविरोधात नसून ती आणखी वरच्या पातळीवरील आहे.
राज्यातील दलित चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा मताला दलित कार्यकर्ते आलेले आहेत. दलित नेते आर. एस. कांबळे म्हणाले की, रामदास आठवले भाजपकडे गेले आहे, तर प्रकाश आंबेडकरांना आपला जनाधार वाढवता आलेला नाही. जिग्नेश मेवानी आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येणे त्यात त्यांना दुसर्या मागासवर्गीय जातींकडून पाठिंबा मिळणे, हे दलित पँथर नंतरच्या नवीन दलित राजकीय समीकरणांची सुरुवात आहे. या नवीन राजकीय समीकरणात महाराष्ट्रातील समाजवादी आणि कम्युनिस्ट पार्टीही सहभागी होण्यास उत्सुक आहेत. दलित चळवळीतील वरिष्ठ नेते भाई वैद्य यांच्या मते धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणार्या सर्व राजकीय पक्षांनी या नवीन राजकीय चळवळीत सहभागी व्हायला पाहिजे. ही लढाई भाजपविरुद्ध नसून देशाच्या संविधान बचावाची लढाई आहे.
– विशाल मोरेकर
प्रतिनिधी जनशक्ति, मुंबई
9869448117