पुणे । भाजपच्या समोर प्रबळ विरोधी पक्ष नाही असे सहजपणे म्हटले जाते! पुण्यातील काँग्रेस पक्षाची अवस्था पाहिली की हे म्हणणे पटते. वर्षानुवर्षे पक्षावर वर्चस्व (कंट्रोल) ठेवून बसलेले नेते, युवकांना संधी नाही, भाईगिरीला वाव असे एक ना अनेक दोष अजूनही पक्षात ठाण मांडून बसले आहेत. भाजप काँग्रेसचेच विकासाचे मुद्दे समोर मांडत आहे. तरीही काँग्रेसला त्याचा फायदा घेता येत नाही. मध्यंतरी सोशल मिडीयावर एक प्रतिक्रया अशी होती की, महागाई कमी करण्यासाठी आम्ही मोदी यांना मत दिले नाही तर माज आणि भ्रष्टाचार काँग्रेसमध्ये वाढला होता त्या विरोधात मतदान केले. अगदी बोलकी प्रतिक्रिया म्हणता येईल. अनेक लोकांमध्ये ही भावना अजून आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपापली घरे भरली पक्षासाठी, समाजासाठी काही केले नाही, असे कार्यकर्तेच म्हणतात. ही जनभावना 2014च्या निवडणुकीत देशभर होती. त्यामुळे पक्ष प्रत्येक निवडणुकीत भुईसपाट होत आला. पक्षाच्या पदाधिकारी यादीत भाई लोकांची नावे त्यामुळे सर्वसाधारण पुणेकर पक्षापासून फार दूर गेले.
नवी भरती थांबली
पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षात विशेषतः युवक आघाडीत नव्याना संधी मिळावी असा प्रयत्न केला. पण तो अन्य नेत्यांनी सपशेल हाणून पाडला. मंत्री, खासदार, आमदार, धनिक यांचीच मुले युवक संघटनेत पदाधिकारी झाली. परिणामी नवी भरती थांबली, वेगवेगळ्या कारणाने दलित अल्पसंख्य दूर होत गेले; पुण्यातही हेच घडले. त्यात उमेदवारीचा नवा प्रयोग केला गेला. आणि पक्षाचे गाडे घसरले ते अजून सावरलेले नाही.
महापालिकेत फक्त 9 सभासद
महापालिकेवरील सत्ता गेली, आमदारांची संख्या कमी झाली, 2014मध्ये तर प्रचंड पराभव झाला. पुण्यातील काँग्रेस खरोखर खचली. सध्या महापालिकेत फक्त 9 सभासद आहेत. संघटनात्मक निवडणुका चालू आहेत आणि चर्चा अशी आहे की साठी ओलांडलेले अगदी सत्तरीला आलेले नेते उभे राहणार आहेत. नव्या नेतृत्वाला दारे बंद आहेत.
गटबाजी पक्षातील लोकशाहीचे लक्षण
सन 1992पासून पुण्याच्या काँग्रेसवर सुरेश कलमाडी यांचे वर्चस्व होते. राजकारण एकतर्फी नसते, त्याप्रमाणे एक गट कलमाडी विरोधी होता. त्या गटाला विलासराव देशमुख, गुरुदास कामत आदी नेत्यांनी खतपाणी घातले. शिवाय गटबाजी हे पक्षातील जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे, असे अभिमानाने सांगितले जाऊ लागले. हे एकमेकांमध्ये झुंजत असताना शरद पवार पक्ष सोडून गेले. त्यांच्याबरोबर पुण्यातील अनेक कार्यकर्ते गेले. ही विभागणी काँग्रेसला महाग पडली. कलमाडीसुद्धा दरम्यान पक्षाबाहेर गेले परत आले. या दोन घटनांनी पक्ष विस्कळीत होण्यास सुरुवात झाली.