नव्या पर्वाचे स्वागत!

0

नवे वर्ष, नवा उत्साह, नवा आनंद, हे नवे वर्ष आपल्या जीवनात येत आहे. एक नवी उमेद, नवी आशा, नव्या प्रेरणा घेऊन. या वर्षाचं स्वागतही अशाच नव्या उत्साहाने करायला हवे. माणसाच्या आयुष्यात दिवस, महिने, वर्षे कशी झटकन निघून जातात ते कळतच नाही. हातातून एखादी वस्तू नकळत निसटून जावी तशी! गतिशील कालचक्र हे पुढे पुढे सरकत असतं. आपल्या सगळ्यांसाठीच नव्या वर्षाचे संकल्प वेगवेगळे आहेत. पण प्रत्येकाची स्वप्नं मात्र तितकीच आतून फुटलेली आणि हवीहवीशी आहेत. नव्या जोमाने सर्वच जण नवी आणि समजूतदार पावलं टाकू या. सर्व ताण फेकून देऊन अगदी मोकळं… अधिक मोकळं जगू या…!

नव्या वर्षाचे देशभरात उत्साहात स्वागत करण्यात आले. तरुणाईचा जल्लोष, विविध कार्यक्रम, फटाक्यांची आतषबाजी अशा वातावरणात सर्वांनी सरत्या वर्षाला रविवारी मध्यरात्री निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत केले. मुंबई, कोकण, गोव्यात नव्या वर्षाची विशेष धूमपाहायला मिळाली. समुद्रकिनारी जाऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्याची प्रथा मागील काही वर्षात रुजल्याने रात्री उशिरापर्यंत मुंबई आणि गोव्यातील समुद्रकिनारी तरुणाईची प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती.नव्या वर्षाचे आगमन सर्वप्रथम न्यूझीलंडमध्ये झाले. ऑकलंड येथील स्काय टॉवरमध्ये यंदा आगळीवेगळी आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर ऑस्ट्रेलियात नव्या वर्षाचे आगमन झाले. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी हार्बर येथे नववर्षानिमित्त भव्य आतषबाजी करण्यात आली, तर भारतात गोवा आणि राज्यात सर्वत्र नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले.

गेल्या वर्षीप्रमाणे नव्या वर्षात नुसते धावत राहणे हे खरे जीवन जगणे नव्हे. या धावत्या जगासोबत धावत असताना जीवनप्रवासात आपणाला विविध प्रवृत्तीचे लोक भेटतात. आपण त्यांना त्यांच्या गुणदोषांसकट स्वीकारतो. त्यांच्या काही गोष्टींच्या आपण इतकं आहारी जातो की त्याचाच उलटा आपल्याला मनस्ताप होतो, असा मनस्ताप टाळण्यासाठी माणसांची नीट पारख करून हवे तेवढेच त्यांच्याशी संबंध ठेवून परस्परांचे नाते संयमी व अतूट कसे राहील याची दक्षता बाळगावी.
वास्तविक पाहता भारतीय संस्कृतीत थर्टी फर्स्टला मान्यता नाही, पण तंत्रज्ञानाने जग एकत्र आणले आणि जगभरातील उत्सव हे आपल्याकडे साजरे होऊ लागले आहेत. आजही संस्कृतीचे ठेकेदार यासाठी राजी नाहीत, पण याचा आनंद घेणार्‍यांची संख्या वाढत चालल्याने तेही हतबल झाले आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत यादरम्यान एकच दिवस असतो, पण यात जी हजारो कोटींची उलाढाल होते यामुळे अर्थकारणालाही चालना मिळत आहे. याचे लोण ग्रामीण भागातही आता पोहोचले आहे. सरत्या साली म्हणजे 2017 मध्ये देशात, जगात विविध क्षेत्रांत अनेक अप्रिय घटना घडल्या. नैसर्गिक आपत्ती कोसळल्या. मानवी जीवन दिवसेंदिवस अधिक सुसह्य बनण्यापेक्षा ते असह्य बनत चालले आहे. राजकारण, शिक्षण, समाज, संस्कृती, अर्थ, व्यापार, विज्ञान-तंत्रज्ञान आदी क्षेत्रांत झपाट्याने बदल होत आहेत. दुसरीकडे पाहायला गेले तर निराशेच्या गर्तेत शेतकरी आत्महत्या करतोय. जगाचा पोशिंदा अशा अवस्थेत जगत असताना नशेत झिंगण्यापेक्षा आपण त्याला मदत करण्यासाठीचा संकल्प करू शकतो का? यावरही विचार केला गेला पाहिजे.

आपल्या सगळ्यांसाठीच नव्या वर्षाची संकल्प वेगवेगळी आहेत. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ती म्हणजे सगळ्यांनी किमान या नव्या वर्षांत तरी हा संकल्प जरूर करून बघण्याची. आपण नेहमी काहीच चांगले होत नाही म्हणून रडत असतो. आजूबाजूच्या सकारात्मक गोष्टींपेक्षा आपण नकारात्मक गोष्टींचा जास्त विचार करू लागतो आणि याचा सगळाच परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. म्हणूनच नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या प्रत्येकांसाठी हा संकल्प फायद्याचा ठरणार आहे. दिवसभरात किंवा आठवड्याभरात ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत त्या एका कागदावर लिहायच्या. मग ही चिठ्ठी बंद करून एका बरणीत भरून ठेवायची. अर्थात वर्षभरात न चुकता या बरणीत आयुष्यातील सुंदर क्षणांविषयी चिठ्ठ्या ठेवायच्या. जेव्हा हे ही वर्ष संपेल तेव्हा 31 डिसेंबरला ही बरणी उघडायची आणि त्यातल्या चिठ्ठ्या वाचायच्या. आहे की नाही सुंदर कल्पना. आपसूकच नकारात्मक विचार हळहळू बाजूला सारून आपण किती सुखाचे क्षण जगलो याचे एकापेक्षा एक सुंदर आठवणी तुमच्या मनासमोर जाग्या होत जातील.

नव्या जोमाने सर्वच जण नवी आणि समजूतदार पावलं टाकू या. सर्व ताण फेकून देऊन अगदी मोकळं… अधिक मोकळं जगू या…! भांडण झालेल्या मित्राला-मैत्रिणीला स्वत: फोन करून, सॉरी म्हणून सारं विसरून जाऊ या. पुन्हा एकत्र हसू या! कुटुंबाला घेऊन मस्तशा नाटक-सिनेमाला जाऊ या. आपल्या गावच्या घरापासून लांब राहून कामात व्यस्त असतानाच, बिनधास्त सुट्टी टाकून गावच्या घरी जाऊ या. आईच्या कुशीत झोपू या. ताण घेऊन काम करण्यापेक्षा आनंदाने बेभान होऊन काम करू या. उत्तम संगीत ऐकू या. जास्तीत जास्त लिह ूया. थोरा-मोठ्यांनी लिहिलेलं वाचू या…! डोंगर-दर्‍या भटकू या, नवे प्रदेश पाहू या. आवडणार्‍याला किंवा आवडणारीला एकदा बिनधास्त सांगून टाकू या मनातलं सारं काही. कुणास ठाऊक, तुम्हाला आवडणारं वा हवं असणारं तुमची वाटही पाहत थांबलेलं असेल नव्या वर्षात?

हे नवे वर्ष आपल्या जीवनात येत आहे. एक नवी उमेद, नवी आशा, नव्या प्रेरणा घेऊन. या वर्षाचं स्वागतही अशाच नव्या उत्साहाने करायला हवे.
नव्या वर्षात सकारात्मक विचार करण्याची सवय लागून तो आपला स्वभाव कसा बनेल यासाठी प्रयत्नांची गरज आहे. नवीन वर्षी आपण सशक्त व सकारात्मक विचारसरणी अंगीकारण्याचा संकल्प सोडू या! या वर्षात आपल्या आचारात आणि विचारात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प करून या नवीन वर्षाला सामोरे जाऊ या!