नव्या सरकारची आज ‘अग्निपरीक्षा’

0

मुंबई: राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस मिळून सरकार स्थापन झाले आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर आज नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला जाणार आहे. त्यासाठी शनिवार आणि रविवार दोन दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता सत्ताधारी आघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव आणला जाईल.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. त्या आघाडीने आपल्याकडे सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा राज्यपालांकडे केला होता. राज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना व त्यांच्या सहकारी मंत्र्यांना गुरुवारी दादरच्या शिवाजी पार्कवर शपथ दिली. तसेच, ३ डिसेंबरच्या आत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी नव्या सरकारला निर्देश दिले होते.

शिवसेनेचे सुनील प्रभू, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडतील. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. सरकारच्या धोरणाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषण करतील. नंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड होईल, अशी माहिती विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.