‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी प्रबोधन करण्याची आवश्यकता

0

धुळे । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गापासून 500 मीटर अंतरावर असलेली दारूची दुकाने बंद झाली आहेत; परंतु नियमात पळवाट काढून ही दुकाने पुन्हा सुरू होणार नाही यासाठी सरकारवर दबाव वाढवावा लागेल. त्यासाठी प्रबोधन करण्याची आवश्यकता असल्याचे मत महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या राज्य सरचिटणीस वर्षा विलास यांनी व्यक्त केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नशाबंदी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानावर चर्चा करण्यासाठी स्काउट-गाइड भवनात उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांची चिंतन बैठक झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, डॉ. रवींद्र टोणगावकर, मधुकर शिरसाठ, अ‍ॅड. रंजना गवांदे, अमोल मडामे, गोविंद कांबळे, प्रा. रणजित शिंदे आदी उपस्थित होते. नशामुक्त महाराष्ट्रासाठी व्यापक स्तरावर मोहीम राबवण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.