जळगाव : लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात ही घटना घडली. चेतन खरोटे (30) असे मयत तरुणाचे नाव आहे.
लग्न विवंचनेत आत्महत्या
चेतन खरोटे हा कुटुंबियांसह नशिराबाद येथे वास्तव्यास होता. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी चेतन खरोटे हा त्याच्या आईला वारंवार लग्न होत नसल्याचा तगादा लावीत होता. याच विवंचनेत असलेला चेतन गेल्या तीन दिवसांपासून व्यसनाच्या आहारी गेला यामुळे चेतनची आई देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून आपल्या नातेवाईकांकडे निघून गेली होती. चेतनने घर आतून बंद करून घेतले आणि घराच्या छतावरील कडी-कोयंड्याला दोरी बांधून आपली जीवनयात्रा संपवल्याचे सांगण्यात आले. बराच वेळ झाला तरी घरातून कुणी बाहेर येत नसल्यामुळे शेजार्यांना संशय बळावला. त्यांनी त्यांच्या आईला माहिती दिली. तेव्हा घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता चेतनने आत्महत्या केल्याचे आढळून आले.
पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि चेतनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. लग्न होत नसल्यामुळे चेतनने पाऊल उचलल्यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्याच्या मृत्यूबद्दल गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. याबाबत नशिराबाद पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.