जळगाव – राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील हॉटेल्स, बियरबार, वाईन शॉप यांची साठा तपासणी करण्यात आली. यात नशिराबाद येथील मे. कामदार ट्रेडर्सच्या साठा तपासणीत देशी दारूच्या २८०० बाटल्या कमी आढळुन आल्या. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी मे. कामदार ट्रेडर्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे.
जळगाव शहरात लॉकडाऊनच्या काळातही सर्रासपणे मद्य विक्री झाली होती. याप्रकरणी राज वाईन्सवर झालेल्या कारवाईत देशी दारूच्या बाटल्या आढळुन आल्या होत्या. दरम्यान या बाटल्या आल्या कोठुन याची चौकशी देखिल राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे करण्यात आली. नशिराबाद येथील कामदार ट्रेडर्समध्ये साठा तपासणी करण्यात आली. या साठा तपासणीत देशी दारूच्या २८०० बाटल्या कमी आढळुन आल्या. याप्रकरणी कामदार ट्रेडर्सचे कशिश गिरीष चांदवानी यांना नोटीस बजावण्यात येऊन खुलासा मागविण्यात आला होता. या खुलाशात चांदवानी यांनी चुक मान्य करीत कमीत कमी दंड करावा अशी विनंती केली. मात्र समाजहितास बाधा पोहोचेल असे कृत्य केल्याप्रकरणी व लॉकडाऊनच्या नियमांचा भंग केला म्हणून नशिराबादच्या कामदार ट्रेडर्सचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी दिले.