भुसावळ- मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासवून त्याचा मात्र खुन केल्याचा आरोप नशिराबादच्या पित्याने केला होता मात्र पोलिस प्रशासनाकडे तक्रारी करूनही न्याय न मिळाल्याने न्यायालयात धाव घेण्यात आली व न्यायालयाच्या आदेशावरून नशिराबादच्या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत तक्रारदार तथा मयताचे वडील रघुनाथ प्रभाकर रोटे (विठ्ठल मंदिर, नशिराबाद) यांनी न्यायालयात दाखल केलेली फिर्याद अशी की, त्यांचा मुलगा पंकज रोटे यास त्याचे साथीदार तसेच संशयीत आरोपी सुरज किशोर पाटील, महेश प्रकाश भावसार (दोन्ही रा.नशिराबाद) यांनी 9 जून 2018 रोजी रात्री सुनसगाव-गोजोरा रस्त्यावर मुरूमाच्या ढिगार्यावर स्वीप्ट कार (एम.एच.19 ए.पी.1213) आदळून अपघात झाल्याचे सांगत मदतीसाठी बोलावले होते मात्र प्रत्यक्षात मुलगा घटनास्थळी गेल्यानंतर त्यास संशयीतांनी जीवे ठार मारले तसेच अपघात झाल्याचे भासवत घटनास्थळावरील पुरावेदेखील नष्ट केले. पोलिसांकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी दखल न घेतल्याने न्यायालयात अॅड.बिपीन पाटील, अॅड.विवेक आवारे, अॅड.अजय बडगुजर यांच्या माध्यमातून फौजदारी खटला दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाचे 156/3 प्रमाणे चौकशी करून कारवाईचे आदेश दिल्यानंतर बुधवारी दुपारी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार करीत आहेत.