जळगाव । वेगाने धावणार्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुुटल्याने नशिराबादजवळील महामार्गावरील सरस्वती फोर्डजवळ अचानक सिंगल रस्ता लागल्याने कार रस्त्याच्या बाजूला आदळली. या अपघातात कारमधील दोन तरुण मित्रांचा गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. यातील एका तरुणाचा साकेगाव येथे साखरपुडा झालेला होता.
अभिजित सुभाष पसारे (वय 30, रा. डोंबिवली, ता.जि.ठाणे) आणि पवन नंदू बागुल (वय 27, रा. मानपाडा, ठाणे) असे दोन्ही मृत मित्रांची नावे आहेत. अभिजित पसारे हा ठाणे येथील एका खासगी कंपनीत व पवन बागुल सुद्धा नोकरीला होता. अभिजित पसारे यांचा साखरपुडा भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे झाला होता. अभिजित पसारे यांचे होणारे सासरे आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठी भावी पत्नी व सासू मुंबईला गेले होते. अभिजित पसारे यांनी भावी पत्नी व सासूला सोडण्यासाठी भाड्याची कार करुन ते 7 जुलै रोजी सायंकाळी साकेगाव येथे मित्र पवन बागुल याच्या सोबत आले होते. त्यानंतर अभिजित व पवन हे दोघे गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास मुंबईकडे जाण्यासाठी निघाले. नशिराबादजवळील महामार्गावरील फोरवेने जात असताना सरस्वती फोर्डजवळ अचानक सिंगल रस्ता लागला. त्यामुळे वेगाने धावणारी कार रस्त्याच्या बाजूला आदळली. यात कारने बर्याच अंतरापर्यंत पलटी मारल्या. अभिजित पसारे हा तरुण जागीच ठार झाला, तर पवन बागुल गंभीर जखमी झाला होता. पवनला खासगीदवाखान्यात त्वरित दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. पवन बागुल याच्या पश्चात आई,
पत्नी असा परिवार आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.