पहाटे साखर झोपेत अपघात : दोन्ही बाजूला दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा
भुसावळ- पहाटेच्या साखर झोपेत दोन्ही कंटेनर समोरा-समोर आदळून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती आहे. नशिराबाद गावाजवळील टी पॉईंटवर रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही बाजूकडील वाहतूक विस्कळीत झाी असून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत तर तात्पुरता नशिराबाद गावातून वाहतूक वळवण्यात आल्याचे समजते
नशिराबाद टी पॉईंटवर अपघात
भुसावळकडून जळगावकडे कंटेनर (जी.जे.26 टी.6100) व जळगावकडून भुसावळकडे येणारा कंटेनर (एम.एच.40 बी.जी.4847) ची समोरा-समोर धडक झाली. अपघात एव्हढा भीषण होता की दोन्ही वाहनांच्या दर्शनी कॅबीनचा चुराडा झाल्याने आतील चालकांसह क्लीनर मिळून दोन ते तीन जण जागीच दगावल्याची भीती व्यक्त होत आहे. ट्रकच्या कॅबीन एकमेकांमध्ये शिरल्याने वाहनाआत असलेल्यांना बाहेर काढणे अशक्य ठरल्याने क्रेन मागवण्यात आली असून त्यांना बाहेर काढल्यानंतरच नेमके कोण जिवंत व कोण गंभीर जखमी आहे ? हे कळू शकणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नशिराबाद हद्दीत अपघात झाल्याची माहिती कळताच ठाणे अंमलदार सुधीर विसपुते यांनी वरीष्ठांना अपघाताची माहिती देत वाहन चालक हसमत अली सैय्यद, एएसआय अरुण राठोड, अमोल पाटील, शरीफ शेख यांना घटनास्थळी रवाना केले तर प्रभारी अधिकारी असलेले भुसावळचे सहाय्यक निरीक्षक मनोज पवार, हवालदार राजू साळुंखे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
32 दिवसांपूर्वीही झाला होता अपघात
सुमारे 32 दिवसांपूर्वी याच अपघातस्थळावर दोन कारची समोरा-समोर धडक होवून जळगावच्या गेंदालाल मिल परीसरातील समुद्रगुप्त उर्फ बंटी चंद्रगुप्त सुरवाडे (20), दीपक अशोक चव्हाण (22), सुबोध मिलिंद सुरवाडे (28), रोहीत जमदाडे यांचा मृत्यू झाला होता तर शुभम इंधवे व सचिन तायडे हे जखमी झाले होते शिवाय समोरच्या वाहनातील तीने जण जखमी झाले होते. या अपघातानंतर पुन्हा मागच्या स्मृती ताज्या झाल्या आहेत.