अमरावतीहून येणारा कपड्यांच्या ट्रकला आग
जळगाव– अमरावती येथून रेडीमेड कपडे घेवून येणार्या ट्रकला अचानक आग लागली. आगीत ट्रकमधील रेडीमेड कपड्याचा माल पूर्णपणे खाक झाला आहे. वेळीच प्रसंगावधान राखून ट्रक रस्त्याच्या कडेला उतरवून ट्रकमधून उड्या मारल्यामुळे ट्रक चालकासह क्लिनर हे दोघ बालंबाल बचावले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती.
काही वेळातच आगीने धारण केले रौद्ररुप
अमरावती येथून सागर रोडवेज ट्रान्सपोर्ट कंपनीचा (एमएच 19 एक्स 632) क्रमांकाचा ट्रक जळगावात रेडीमेड कपड्यांचा माल घेवून जळगावातील ताहेरी गोल्डन ट्रान्सपोर्ट याठिकाणी येत होता. दरम्यान महामर्गावरुन धावत असलेल्या ट्रकला अचानक आग लागली. यावेळी ट्रकची मागच्या बाजूने आगीच्या ज्वाला आकाशात उडत असल्याचे दिसताच महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांनी ट्रक चालकाला आग लागल्याचे सांगितले. त्यानंतर ट्रक चालक ईरफान खान याला ट्रकच्या मागील बाजूस पूर्ण आग पसरलेली असल्याचे दिसताच त्याने तात्काळ ट्रक रस्त्याच्या कडेला उतरवित. त्याठिकाणी असलेल्या खड्ड्यात ट्रक पलटी केला. व ट्रकमधून क्लिनर मदार खान याच्यासोबत उडी घेत आपला जीव वाचविला.
स्वातंत्र्य धावत्या दुचाकीने घेतला पेट
धावत्या मोटारसायकल आग लागल्याची घटना दि. 27 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शहरातील स्वातंत्र्य चौकात हॉटेल रुपारी समोर घडली. घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या बाबत मिळाली माहिती अशी की, शहरातील मोरे ऑटो वर्क गॅरेजवर प्रकाश चौधरी यांनी त्यांची हिरोहोंडा स्प्लेंडर (क्र. एम.एच. 19 एक्स. 6986) ही गाडी दुरुस्तीसाठी टाकली होती. काम सुरु असतांना दुचाकीसाठी आवश्यक पार्ट घेण्यासाठी गॅरेजवर काम करणारा रिजवान शेख हा गाडी घेवून ऑटो पार्टच्या दुकानात जात असतांना स्वातंत्र्य चौकात हॉटेल रुपाली समोर गाडीने अचानक पेट घेतला. क्षणातच आगीचे मोठ मोठे लोळ निर्माण झाल्याने परिसरातील रमेश नांदोडे, सचिन मोहेते, वाहतूक शाखेच्या वर्षा गायकवाड यांनी धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आग विझविली. दरम्यान, या घटनेत मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण समजु शकले नसले तरी वाढत्या तापमानामुळे ही घटना घडली असा प्रथमिक अंदाज आहे.